पान:Bhovara-Iravati Karve.pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भोवरा / १५

महात्मा असेल; पण बाकी सारे भोंदू आणि किसानांच्या मुलांनी मुळीच भिक्षा मागता कामा नये. माझ्या घरी पोरांनी भीक मागितली तर त्यांना सपाटून मारून काढू!" असा रोज काही ना काही वाद चाले. रंगात आला म्हणजे धनसिंग आपल्या गावच्या गोष्टी सांगे. "तुम्ही आमच्या गावी या. सहा महिने राहिलात तरी पोटभर जेवायला घालीन, आणि पै घेणार नाही"
 "अरे, मग हा एवढ्या कष्टाचा हमालीचा धंदा का करतोस?"
 ‘‘आम्हांला भांडी व कपडे विकत घ्यावे लागतात. त्यांसाठी रोख पैसे लागतात. वर्षातून महिनाभर मजुरी करून पन्नास-पाऊणशे रुपये मिळवले की वर्षांची गरज भागते.”
 रोजच्या बाजारात आम्हांला मीठ कमी पडायचे. चार आण्यांचे मीठ लागे, चंडीप्रसाद म्हणे, येथे मीठ फार महाग. आणि धनसिंग-वीरसिंग पण सैंपाक करताना रोज मीठ मागायचे. चंडीची रोजची खळखळ. मी म्हणाले, “दे रे मीठ, काय एवढया मिठासाठी भांडतोस?" तो म्हणे, "भिकाऱ्यांना काही द्यायचं नाही आणि ह्यांनी चोपून हमाली घेऊनही ह्यांना मीठ द्या म्हणता! कंपनी माझे साल काढील!" मिठावरून गोष्टी निघाल्यावर धनसिंगाने म्हटले, “बाई, आमच्या मुलखात मिठाची फार चणचण. वर्षाकाठी नाहीतर दोन वर्षांनी एकदा भोटिये लोक मीठ, जनावरांची कातडी, कस्तुरी वगैरे घेऊन येतात. असा व्यापारी आला म्हणजे आम्ही त्याला सामोरे जाऊन भेटतो व घरी घेऊन येतो. मग दोनतीन दिवस तो व्यवस्थित खातो, पिता, आराम करतो व मग मीठ विकत देतो"
 "मिठाची किंमत काय रे?”
 "एक माप मिठाला दोन मापं तांदूळ देतो बाई !”
 हा तांदूळ मिठाचा भाव ऐकून आम्हा सर्वांनाच फार गंमत वाटली. “अरे, जेवणाखाणाचे काही कापून घेतोस का नाही त्या भोटियाकडून?”
 "छे छे, हे व्यापारी आमचे पिढीजाद मित्र असतात. हल्ली मी ज्यांच्याकडून मीठ घेतो त्यांचाच बाप माझ्या बापाला मीठ विकीत असे. असा किती लांबून शेकडो मैलांचा प्रवास करून, पहाड ओलांडून येतो. जायला निघाला की आम्हांला वाईट वाटते."
 ह्या व्यापाराची आणखी विलक्षण गोष्ट अशी, की भोटियांची भाषा ह्यांना येत नाही व ह्यांची भोटियांना येत नाही. काहीतरी मोडकेतोडके