पान:Bhovara-Iravati Karve.pdf/147

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
        १६
       विनाशाची सुरुवात

 आसामला विमानाने जाणारे लोक आणि इतर ठिकाणी विमानाने जणारे लोक ह्यांच्यात फार अंतर असते. एरवी दिल्लीला किंवा मद्रासला विमानाने जायचे म्हणजे लोकांच्या हातांत एक, फार तर दोन, अगदी हलक्या पेट्या असायच्या. वजन करताना एखादा पौंड वजन जास्त नाही ना भरत इकडे प्रत्येकाचे लक्ष. कधीतरी एखादे अमेरिकन कुटुंब असे दिसते की सामानाचे वजन जास्त भरले तरी चिंता नाही-नोटांच्या लठ्ठ पुडक्यांतून भराभर नोटा काढून देत. एकदा दोनतीन हिंदी लोकसुद्धा जड सामान घेऊन जाताना पाहिले. पण एकंदरीने विमानातून जाताना प्रवास सुटसुटित करण्याकडे सर्वांचा कल. पण आसामला जाणाऱ्या उतारूजवळमाझ्याखेरीज सर्वांजवळच-खूपखूप सामान दिसले. कित्येकांजवळ तर पेट्यांबरोबर वळकट्यासुद्धा होत्या. जाणारे उतारूसुद्धा निरनिराळ्या पेशातले दिसले. थोडे लोक श्रीमंत किंवा माझ्यासारखे सरकारी खर्चाने जाणारे, पण बरेचसे मध्यम स्थितीतले तर काही अगदी अतिशय गरीब होते. कलकत्त्याहून गौहाटीला आगगाडीने जायचे म्हणजे इतका वेडावाकडा प्रवास आहे की बरेच लोक विमानाने जातात. कलकत्त्याहून सरळ उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याशी जावयाचे, मग पूर्व पाकिस्तानला वळसा घालून आसामात पोचावयाचे. आगगाडीचा एक मार्ग तर पाकिस्तानातून जातो. मध्येच कस्टमची पाहणी. किती वेळ पाकिस्तानी लहरीवर अवलंबून राहावे लागेल त्याची निश्चिती नव्हती. सामान चोरीला जाण्याचा किंवा जप्त होण्याचाही संभव फार. उत्तरेकडचा लोहमार्ग बराच कच्चा होता. कुठे मार्ग खचलेला असायचा तर पूल धोक्याचा असायचा. कलकत्त्याहून गौहाटीला