पान:Bhovara-Iravati Karve.pdf/145

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / १४५

 शास्त्रीय शोध लागले, सृष्टीच्या काही अंगांचे ज्ञान झाले म्हणून त्याच्या जोरावर पूर्वीच्या लोकांना हसणे म्हणजे लक्तरे गुंडाळणा-याने नागड्याला हसण्यासारखे आहे. काही सत्ये हाती आली म्हणून सत्य-शोधकाला लागणारी बुद्धी आपण आत्मसात केली, असे मुळीच नाही. सत्तेच्या लोभाने, द्वेषाने, अहंभावाने मानवी मने इतकी गढूळ झाली आहेत की सर्व सत्य एखाद्याला उमजणे शक्यच नाही ही साधी गोष्टही त्यांना समजत नाही. मला समजले नाही, माझे चुकत असेल असे वाटण्याची ज्ञानाची पहिली पायरीही ज्यांनी ओलांडली नाही, ते माझे तेच सत्य असे कंठरवाने म्हणणारच. एवढेच म्हणून ते थांबते तरी पुष्कळ होते, पण त्याचबरोबर इतरांचे खोटे, हा सिद्धान्त आपोआपच येतो व इतरांचे म्हणणे सर्वथैव दडपून टाकण्याचे सर्व उपाय योजण्यात येतात. ह्या खटाटोपात सत्याचा शोध तर होत नाहीच, पण आत्मनाश व समाजाचा नाश मात्र होतो.
 आप्तवाक्यावर विसंबून राहिल्यानेच सत्य समजण्यास अडचण पडते असे नाही. प्रत्यक्ष प्रत्येकाचे डोळे, कान, जीभ व त्वचा एकच गोष्ट निरनिराळ्या तऱ्हेने बघत असतात, ऐकत असतात; चवीने अनुभवीत असतात व स्पर्शाने जाणत असतात. एकच सामाजिक घटना निरनिराळ्या व्यक्तींना निरनिराळ्या त-हेने प्रतीत होत असते. सिंहगडावरून मेण्यात बसून एकजण उतरत होता व एकजण गड चढत होता. अध्र्यावर दोन्ही मेण्यांची गाठ पडली तेव्हा उतरणारा माणूस “काय उकडतं आहे," म्हणून अंगावरील पांघरूण दूर करीत होता; तर चढणारा माणूस “काय थंडी लागते आहे", म्हणून शाल गुंडाळून घेत होता. ही गोष्ट सर्वांनी लहानपणी वाचलेलीच आहे. लहान मुले आवळे, कैऱ्या, चिंचा खात असतात. त्यांना विचारले की 'आंबट आहे का?' तर ती म्हणतात ‘छे! छे! गाभुळलेल्या आहेत, खा ना' पण मोठ्यांना त्या तोंडात घालवत नाहीत. मुलाला घर सुखाचे वाटत असेल; पण त्याच्या बायकोला खाष्ट सासूच्या हाती वागावे लागत असेल, तर तेच घर दु:सह होईल. सत्य शोधताना निरनिराळ्या माणसांना तीच गोष्ट निराळी भासते, ही गोष्ट झाली मानवी जगातील सत्याबद्दलची. मग अंतिम सत्य शोधताना फक्त माणसाच्याच दृष्टीने जग पाह्यचं, का इतरांच्याही?
 बागेत हिंडताना हिरवी पाने, तांबडी, पांढरी, पिवळी फुले, निळे