पान:Bhovara-Iravati Karve.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / १४३



 लहानगा धनू मला म्हणत होता, “आत्याबाई, माझ्या वहीत एक वाक्य लिहून तुमची सही द्या” “कशाला रे बाबा?” “त्याचं असं आहे,' धनू सांगू लागला, “मी माझ्या मित्रांना सांगितलं की तुम्ही माझ्या आत्याबाई आहात तर ते म्हणत, ‘छट्. तू बाता मारतो आहेस. आता तुम्ही ह्या वहीत सही दिलीत तर त्यांना पटेल की तुम्ही माझ्या आत्याबाई म्हणून” “पण धनू, काल मी जवळजवळ पन्नास मुलांना माझी सही दिली; म्हणून काय मी त्यांची सगळ्यांची आत्याबाई होईन होय? हवं असलं तर मी असे लिहिते, की हा वेडा धनू माझा भाचा आहे व खाली सही करते; म्हणजे तुझ्या मित्रांची खात्री होईल, की मी तुझी आत्याबाई म्हणून!" पण सत्य शाबीत करण्याचा हा मार्ग धनूला पसंत पडेना व दुसरे तर काही सुचेना. बिचारा गप्प बसला.
 आम्ही जेवायला बसलो होतो. मुलांच्या आवडीची ताज्या वाटाण्याची उसळ होती. गौरी तोंड वाईट करून उसळ ‘चिवडीत' म्हणाली, “उसळीला तार आली आहे.' मी गरजले, “हा फाजीलपणा मला खपायचा नाही. नको असली तर मला दे. म्हणे, ताज्या उसळीला तार आली आहे. तिने मुकाट्याने उसळ माझ्या पानात घातली. “काय शिळी आहे का आंबली आहे, का आहे तरी काय?" माझं आपलं पुटपुटणं चालूच होतं. मी उसळ खाण्यासाठी घास उचलला, तर काय! खरोखरीच उसळीला तार येत होती! गौरी खुदकन हसली. “उसळीला तार आली आहे ग. कशानं बुळबुळीत झाली बघ बरं.' असं मामंजी म्हणाले असते, म्हणजे मी ताबडतोब काही न बोलता कशी झाली आहे ते पाहिलं असतं व चौकशीअंती उसळीत भेंडी गेल्याचे निष्पन्न झाले असते. पण गौरीवर विश्वास ठेवायलाच मी तयार नव्हते. मनुष्य सांगते आहे ते खरे असण्याचा संभव आहे का, असा विचारच मी केला नाही. कोण सांगते आहे इकडेच माझे लक्ष होते.
 जर्मनीचा फ्रेडरिक द् ग्रेट म्हणून एक राजा होता. त्याच्या पदरी पुष्कळ शास्त्रज्ञ होते. एकदा फ्रेडरिक निरनिराळ्या शास्त्रज्ञांबरोबर आपल्या बागेत हिंडत होता. बागेत शोभेसाठी वेगवेगळ्या रंगांचे काचेचे गोले रंगीत काठ्यांवरून लावले होते. एका गोळ्याजवळ फ्रेडरिक उभा होता. त्याने शास्त्रज्ञांना हाक मारली व एक चमत्कार दाखवला. त्या गोळ्यांची जी बाजू सूर्याच्या उन्हाकडे होती ती थंड होती, व सावलीतली बाज तापली होती. असे का व्हावे? एक आठवडाभर ह्या विषयाची चर्चा