पान:Bhovara-Iravati Karve.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / १४१

झाले असे सिद्ध झाले. आता त्या पक्ष्याचा उपयोग कोणी रत्ने वेचण्यासाठी करीत असे, ही गोष्ट कल्पनेतील का खरी हे समजण्यास मात्र सध्या काही साधन नाही.
 दुसऱ्या महायुद्धापूर्वी चीनमधे पेकिंगजवळ फार मोठे उत्खनन झाले; व त्यात पुराणकालीन मानवाच्या काही कवट्या व सांगडे सापडले. या कवट्यांचे फोटो व मापे पण घेतलेली आहेत. ते दिवस फार धामधुमीचे होते. जपानची चीनवर स्वारी झालेली होती व हळूहळू जपानी फौजा पेकिंगजवळ पोचत होत्या. शेवटी पेकिंग जपान्यांच्या ताब्यात जाण्याच्या आत घाई करून सर्व हाडे काळजीपूर्वक खोक्यात भरली व खोके बंद करून, काही अमेरिकन ऑफिसर परत चालले होते, त्यांच्याबरोबर दिले. ही गाडी वाटेत जपानी सैन्याने अडवली व सर्व अमेरिकनांना कैदेत घातले. हाडांनी भरलेले खोके मात्र ह्या धावपळीत नाहीसे झाले. जपान्यांनी नेले म्हणावे तर ते कानांवर हात ठेवतात. अमेरिकनांनी शोध केला. युद्धानंतर टोकियोतही शोध घेतला. पण ते सापडत नाही व इकडे चीन व रशिया म्हणत आहेत की हा अमोल ठेवा अमेरिकेनेच चोरून दडवून ठेवला म्हणून! ह्या सगळ्या भानगडीत मानवेतिहासाचे एक साधन मात्र कायमचे नाहीसे झाले; व हाडांचे फोटो व मापे ह्यांवरच आता अवलंबून राहावे लागले. पेकिंगजवळ जेथे जुने उत्खनन झाले, तेथे आणखी खणल्यास तसेच सांगाडे सापडण्याचा संभव मात्र आहे.
 पुरावाच नाहीसा झाल्यामुळे आप्तवाक्यावर कसे विसंबावे लागते ह्याचे आपल्याकडील उत्तम उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वरीची राजवाडे संशोधित प्रत हे होय. राजवाड्यांना ज्ञानेश्वरीचे एक जुने हस्तलिखित मिळाले व त्यावरून त्यांनी एक ज्ञानेश्वरीची प्रत छापली. ह्या छापील प्रतीत त्यांनी आपल्या मते काही सुधारणाही केल्या. राजवाड्यांनी केलेले फेरफार काय व मूळ प्रत कशी आहे, हे पाहण्याची इच्छा अर्थातच पुष्कळांना होती. काही टीकाकारांनी राजवाड्यांना सापडलेली प्रत तितकी जुनी नसावी, असाही अभिप्राय व्यक्त केला. त्या प्रतीनंतर इतरही हस्तलिखिते मिळाली; व त्या सर्वांचा तुलनात्मक अभ्यास करणे अवश्य झाले. पण राजवाड्यांनी संशोधिलेले हस्तलिखित आज नाहीसे झालेले आहे. कोणी म्हणतात, राजवाड्यांनी टीकाकारांवर रागावून ते जाळून टाकले! मूळ पुरावाच