पान:Bhovara-Iravati Karve.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४० / भोवरा

ठरले. अर्थातच डॉसनला सापडलेल्या हाडांचेही परीक्षण झाले व त्यावरून असे ठरले की, इतर प्राण्यांची हाडे २-२॥ लाख वर्षांपूर्वीची, कवटी सुमारे एक लाख वर्षांपूर्वीची आणि जबड्याचे हाड जेमतेम १००० वर्षांपूर्वीचे आहे! ह्या विलक्षण कालनिर्णयामुळे जबड्याच्या हाडाचे पुन्हा एकदा सूक्ष्म निरीक्षण सुरू झाले. ह्या निरीक्षणात असे आढळून आले की, जबड्याचे हाड खरोखरीच एका आधुनिक वानराचे आहे. त्याचा काही भाग मोठ्या खुबीने कापून व काही दात युक्तीने तोडून तो माणसाच्या जबड्यासारखा थोडा दिसावा म्हणून प्रयत्न केला होता. तसेच एका रसायनात बुडवून ठेवून त्याला जुन्या हाडाचा असतो तसा रंग दिला होता. म्हणजे डॉसन व त्याचा सहकारी ह्यांनी बुद्धिपुरस्सर सर्व जगाची फसवणूक केली होती!
 ह्या सर्व प्रकारात आंधळेपणाने डॉसनवर विश्वास ठेवला म्हणून शास्त्रज्ञांना दोष देता येत नाही. मानवाच्याच काय पण इतर प्राण्याच्या उत्क्रांतीचेही शास्त्र नवे आहे. जसजशी निरनिराळी हाडे सापडत आहेत. तसतसे ज्ञान वाढत आहे. धड माणूस नाही, धड वानर नाही अशा कोणत्या तरी प्राणिजातीपासून एक वानरांची व एक माणसांची अशा शाखा निघाल्या, असा सिद्धान्त आहे. ह्या उत्क्रांतीत कोठच्या तरी एका काळी माणसाचा जबडा सर्वस्वी हल्लीच्या वानरासारखा व कवटी मात्र बराच आधुनिक माणसासारखी नसणारच, असे काही खात्रीने सांगता येईना. बरे, डॉसनसारखा प्रतिष्ठित माणूस फसवीत असेल, अशी शंका कोणाला नव्हती. तेव्हा शास्त्रज्ञ पाहता पाहता फसले गेले तर नवल नाही.
 काही शास्त्रांत प्रयोग करणे शक्य असते; व प्रत्यक्ष पडताळून पुस सांगतो ते खरे का खोटे, हे ठरवता येते. पण अशा शास्त्रांतही पारंगत होण्यास अर्धे आयुष्य गुरुजनांचे वाक्य प्रमाण मानून ते सांगतील त्या मार्गाने जावे लागते व अशी उपासना केल्यावर स्वयंनिर्णयाचा आधिकार प्राप्त होतो. काही वेळा लोकांच्या सांगण्यावरच विश्वास ठेवावा लागतो. मूळ गोष्ट इतरांना पहावयास मिळत नाही. रूक पक्ष्याची गोष्ट भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टीत सगळ्यांनी वाचलेली आहे.रूक अशा पक्ष्यासारखा प्रचंड पक्षी असेल असे कोणास खरेही वाटत नसे. पण अशा पक्ष्यांची अंडी व सांगाडे आफ्रिका खंडात सापडले. व माणसाला पेलून नेण्याइतके मोठे पक्षी पृथ्वीवर होते- ते गेल्या काही शतकांतच नाहीसे