१४ / भोवरा
वन्संना हे त्यांचे वर्तन फार चमत्कारिक वाटे; कारण महाराष्ट्रात मुंडन
केलेली विधवा म्हणजे एक जिवंत प्रेत वावरत असते; पण ह्या बायांना
जगण्यात-निदान ह्या यात्रेपुरता तरी-आनंद होता हे निर्विवाद. या त्यांच्या
हसण्यात मलाही फार आनंद वाटे.
ह्या यात्रेला एक मोठे गालबोट म्हणजे भिकाऱ्यांचे. वाट डोंगरी व
रोजची चाल असल्यामुळे पंढरपूरच्या यात्रेसारखे भिकार लोटत नाही, पण
दर गावाशी लहान मुले व मुली भिक्षा मागतात. यात्रेकरू पाहिले की
हातातले काम टाकून भीक मागायला यायची. कधीकधी कामाला जाणाऱ्या
पहाडी बायका भीक मागत. ह्या भीकमागेपणाचा आम्हांला फार राग येई.
ही सर्व शेतकऱ्यांची मुले व बायका; ह्यांनी भीक मागू नये असे वाटे.
यात्रेकरूंनीच त्यांना भीक मागायला शिकवले असे वाटते. ही एक महायात्रा
असल्यामुळे निरनिराळ्या मार्गानी पुण्य जमा करण्याचा खटाटोप चाललेला
असतो.
सर्वात मजेदार व स्वस्त उपाय म्हणजे दोऱ्याची काही रिळे विकत
घेऊन प्रत्येक भिकाऱ्याला काही वाव लांब दोरा द्यावयाचा. त्या दोऱ्यासाठी
मुले-बाया सारखी कटकट करतात. 'सुई-धागा, सुई-धागा’ म्हणून मागे
लागायची. पहिल्याने हा प्रकार काय ते आम्हांला कळेचना. मग पाहिले तो
एके ठिकाणी एक लठ्ठ वाणी रीळ हातात धरून मुलाच्या हातात दोऱ्याचे
टोक देई व त्याला लांब जावयास सांगे व वीसपंचवीस पावलांवर दोरा
तोडी. त्याचप्रमाणे वाटभर तो दोरा वाटीत होता. 'सुताला धरून स्वर्गाला
जायचा' त्याचा दृढनिश्चय झालेला होता ह्यात शंकाच नाही. आंधळा,
अपंग, महारोगी अशा माणसांखेरीज कोणासही काही द्यावयाचे नाही, हा
आमचा निश्चय. जेवावयास करून, ताट वाढून घास घेणार तो रोज भगवी
वस्त्रे परिधान केलेले लोक ‘माई, जेवण वाढा' म्हणून तयार. आम्ही त्यांना
काहीही दिले नाही, म्हणजे चंडीप्रसाद फार कष्टी होई. सर्व तऱ्हेच्या
भिकाऱ्यांवर आमची टीका चालली असताना एकदा तो रागारागाने
म्हणाला, “तुम्हांला एवढं कसं कळत नाही? तुम्ही भिकाऱ्यांवर उपकार
नसून ते तुमच्यावर करीत असतात!पुण्य गाठी बांधायची ही सुवर्णसंधी तुम्ही घालवलीत तर नुकसान तुमचंच आहे!" धनसिंग वीरसिंगना मात्र आमचे म्हणणे पटे. ते म्हणत, "बाई, ह्यातला एखादा