पान:Bhovara-Iravati Karve.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / १३९

प्रामाण्यावर बालतो असे नव्हे; तर मी मी म्हणणारे शास्त्रज्ञही आप्तवाक्याच्या आहारी कसे जातात, हे पाहण्यासारखे आहे.
 इंग्लंडमध्ये १९०८ साली डॉसन नावाचा एक प्रतिष्ठित गृहस्थ फिरावयास जात असता रस्त्याची खोदाई चालली होती, तेथे गेला. तेथे काही हाडे व माणसाची एक कवटी सापडली असे कळल्यावर तो खाली उतरला. माणसाची कवटी अति पुराणकालीन आहे, हे ओळखून त्याने कवटी व इतर हाडे उचलून आणली व त्यांचे वर्णन प्रसिद्ध केले. प्राण्यांची हाडे, सुमारे दोन अडीच लाख वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये असले प्राणी राहत असत, त्यांची होती. माणसाची कवटी त्यांच्या समकालीन म्हणून तितकीच जुनी, म्हणून ह्या हाडांचे महत्त्व. अतिशय विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या कवटीबरोबरच एक खालच्या जबड्याचे हाडही सापडले होते व ते त्या कवटीबरोबरचेच असे डॉसनचे म्हणणे होते. जबड्याचे हाड माणसाच्या जबड्यासारखे नसून आधुनिक वानराच्या जबड्यासारखे आहे असे कित्येक प्राणीशास्त्रज्ञांचे मत पडले. पण इतर प्राण्यांच्या हाडांचे जे अवशेष होते, त्यांत वानराची हाडे मुळीच नव्हती व ते हाड त्या कवटीचेच असले पाहिजे, असे दुसरे शास्त्रज्ञ म्हणत. त्या कवटीवर व जबड्यांवर कित्येक ग्रंथ झाले. त्यावरून प्राचीन मानव कसा दिसत असेल, ह्याची कितीतरी चित्रे प्रसिद्ध झाली. त्या कवटीची व जबड्याची मोजमापे झाली व अडीच लाख वर्षांपूर्वी मानवाचे डोके सध्याच्या मानवाच्या डोक्याएवढे मोठे व आकृतीनेही सध्याच्या मानवाच्या डोक्यासारखेच होते व जबडा मात्र वानराच्या जबड्यासारखा होता, असा सिद्धांत प्रस्थापित झाला. ह्या सिद्धान्ताविरुद्ध लिहिणारे एक दोन शास्त्रज्ञ होते, पण त्यांच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. ह्या पुराणमानवाचे “एओ अॅन्थोपस डॉसोनी” (डॉसनने शोधलेला मानवाच्या प्रभावळीचा मनुष्य) असे अगडबंब लॅटिन नामकरण झाले व जगात जेथे जेथे मानवशास्त्र शिकवीत, त्या त्या सर्व संस्थांतून विद्यार्थ्यांना ह्या मानवाची वर्णने पाठ करावी लागली.
 १९५१-५२ साली पुराणकालीन हाडांचा जुनेपणा ठरवण्याची एक नवीन रासायनिक रीत एका शास्त्रज्ञाने शोधून काढली व ती रीत सर्व तऱ्हेच्या हाडांबाबत लागू पडते का, हे पाहण्यासाठी ब्रिटनमधल्या म्युझिअममध्ये असलेल्या प्राण्यांच्या व माणसांच्या हाडांवर प्रयोग करण्याचे