पान:Bhovara-Iravati Karve.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३८ / भोवरा

येणे शक्य आहे? जे सांगतात त्यांचा शब्द हेच ना सत्याचे प्रमाण? कोठच्या तरी बाबाचेच वाक्य शेवटी प्रमाण मानावे लागते.
 हल्लीच्या युगात शब्दप्रामाण्याला महत्त्व नाही हे म्हणण्यात अर्थ नाही. साध्या व्यवहाराचं काय पण शास्त्रीय बाबतींतसुद्धा शब्दप्रामाण्यावर विसंबून राहावे लागते व अशा वेळी माणूस विश्वास ठेवतो ते अमकी गोष्ट बुद्धीला पटते म्हणून नव्हे; तर अमक्याने सांगितली म्हणून.
 गौरी आम्हांला गोष्ट सांगत होती : “त्या लहानग्या कुत्र्याने छोट्या जॉनच्या हाताला बांधलेली दोरी कुरतडून टाकली व त्याची सुटका केली मग जॉन कुत्र्याच्या पाठीवर बसून भरधाव पळत सुटला व चोराच्या गुहेपासून दूर गेला..." ही घटना ऐकल्याबरोबर आम्ही सर्वांनी एकच गिल्ला केला. “गौरे, काहीतरी सांगू नकोस. सहा महिन्यांचं लहानसं कुत्रं आठ वर्षांचं मूल पाठीवर घेऊन कधी पळू शकणार नाही.” गौरी आमचे ऐकेना, तेव्हा तिला वेड्यांत काढून आम्ही मोकळे झालो. सर्वांनी गौरीपुढे बुद्धीची फुशारकी मारली तरी या हकीकतीवरून एवढेच दिसते की, आम्ही गौरीच्या शब्दावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हतो. एखाद्या लट्ठ इंग्रजी पुस्तकात जर कोणी लिहिले असते की अमक्या देशातली कुत्री इतकी मोठा व बावळट असतात की तेथे ती घोड्याप्रमाणे माणसाच्या बसण्यासाठी उपयोगी पडतात, तर आम्ही खचित त्यावर विश्वास ठेवला असता!
 गौरी बागेतून पळत पळत येऊन सांगू लागली असती की, "अरे दादा, मी आत्ता एक बेडूक पाहिला, तो सापाला खात होता तर कॉलेजात जाणाऱ्या तिच्या दादाने तिच्यावर कदापि विश्वास ठेवला नसता. पण तोच दादा प्राण्यांविषयी नवीनच प्रसिद्ध झालेल्या एका पुस्तकातील सापाला खाणाच्या बेडकांविषयीचे वर्णन घरातील प्रत्येकाला वाचून दाखवीत आहे. बेडूक हा प्राणी सापाला खाणे शक्य आहे का, असा मूलगामी प्रश्न स्वतःला विचारतच नाही. तसा प्रश्न विचारण्याची पात्रता अजून त्याला आली नाही. त्याचे सृष्टीविषयक ज्ञान आज तरी बव्हंशी त्याचे शिक्षक, आईवडील व पुस्तके ह्या आप्तांच्या शिकवण्यावर आधारलेले आहे. कसल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा ह्याबद्दल तो विचार करीत नाही, कोणावर विश्वास ठेवायचा, ह्याबद्दलच त्याने विचार केला आहे.
 फक्त लहान मुले व साधारण माणसे ह्यांचाच व्यवहार शब्द-