पान:Bhovara-Iravati Karve.pdf/137

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / १३७

पडलीच पाहिजे व ते निर्भय झालेच पाहिजे ही अपेक्षा मात्र चूक आहे. जगांत सर्वत्र जंतू पसरले आहेत व ते आपल्या अंगात शिरून रोगराई होईल, ह्या ज्ञानामुळे जीवनांतील गंमत नाहीशी झाल्याची अनेक उदाहरणे मी पाहिली.
 मला आठवते, एकदा एक विलायती माणूस आपल्या लहान मुलाला घेऊन आमच्याकडे चहाला आला होता. फराळाला नाना तऱ्हेचे गोडाचे व तिखटाचे पदार्थ केले होते. बापाने एक कपभर बिनदुधाचा चहा घेतला व मुलाला दूध हवे असूनही घेऊ दिले नाही. दुधात टायफॉइडचे जंतू असतील ही भीती! माझी मुले खात होती व तो बिचारा मुलगा आशाळभूतपणे बघत होता. पण बापाने स्वतः खाल्ले नाही व मुलालाही खाऊ दिले नाही. शेवटी टेबलावरचे एक केळे मुलाला दिले व आपण एक खाले. खाण्याच्या पदार्थांत जंतू असतील ही भीती! केळ्याचे साल स्वतः काढले म्हणजे आतमध्ये निर्जतुक शुभ्र पांढरे फळ असते ते खाल्ले तर अपाय होणार नाही ही कल्पना. शेवटी हा कोल्हा-करकोच्याचा पाहुणचार संपला व पाहुणे निघून गेले.
 जी गोष्ट आनंदाची तीच सत्याची. पूर्वीच्या लोकांचे सत्यशोधन व हल्लीच्या लोकांचे सत्यशोधन ह्यांत जो फरक आहे तो उपकरणांचा आहे, मनोवृत्तीचा नाही. गेल्या सहा हजार वर्षात मानवाने जो ज्ञानाचा व द्रव्याचा संचय केला आहे, त्यामुळे सत्यशोधनाची निरनिराळी साधने उपलब्ध झाली व आता त्याचा खटाटोप व आटापिटा जास्त वाढला. पूर्वी ज्ञानाची साधने सोपी, सर्वांच्या जवळ असलेली अशी असत व म्हणून अमका म्हणाला ते खरे का खोटे, हे स्वतः पडताळून पाहण्याची शक्यता तरी होती. आता मात्र बहुसंख्य लोकांना अमका असं म्हणतो म्हणून विश्वास ठेवण्याखेरीज गत्यंतर नाही.
 अमक्या दिवशी मृगनक्षत्रातील व्याधाचा तारा सूर्याबरोबर उगवला, असे जेव्हा जगभर देशांतील ज्योतिर्विद सांगत, तेव्हा ते कितपत बरोबर आहे, ह्याचा अंदाज करणे त्या अक्षांश-रेखांशावर राहणाऱ्या इतर लोकांना स्वतः लौकर उठून बघणे शक्य असे. पण आता मृग नक्षत्रातील अमक्या ताऱ्याजवळ मोठे तेजोमेघ आहेत व त्यात आपल्या सूर्यमालेसारख्या कित्येक सूर्यमाला आहेत असे सांगतात, त्याचा प्रत्यय काय आपल्याला