पान:Bhovara-Iravati Karve.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / १३५

सावकाश सुरुवात होऊन वक्र गतीने गिरकत गिरकत वर जाणारी मल्हाराची तान आहे, की क्षणाक्षणाला कडकडाट करणारी मेघगर्जना आहे; की ऐकणाच्या हृदयाची धडधड आहे, हेच मल्हार ऐकताना कळेनासे होते. प्रियकरासाठी एखाद्या माणसाचा तो टाहो नसून बैठकीच्या बाहेर सर्व सजीव निर्जीव सृष्टी प्रत्येक मेघगर्जनेबरोबर उत्कंठेने कापत असते. ती उत्कंठा, ती धडपड, ते तांडव, मल्हाराच्या तानेतानेने वाढत जाते व राग संपायच्या वेळी खरोखरच गडगडाट होऊन पाऊस पडायला लागला तर मल्हारानेच पावसाला आवाहन केले, याबद्दल मनाला शंका वाटत नाही.