पान:Bhovara-Iravati Karve.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३४ / भोवरा

सावली, दाट हिरवे, पिवळे, तांबडे असे भडक रंग असलेली झाडे व फुले, कातीव दगडांचे सौंदर्य असलेले काळे स्त्री-पुरुष, काळ्या म्हशी व तांबड्या गायी, निळे-काळे डोंगर यांना कागदावर जिवंत करणारा चित्रकार जन्मायचा तरी आहे, किंवा मी पाहिला तरी नाही. मी मोठ्या उद्वेगाने उठून चालू लागे. आमचे काव्य, आमचे वाङ्मय, आमची कला, काहीच का आमच्या जीवनाशी व सृष्टीशी संबंध नसलेली अशी आहे, असा मला विचार पडे. पण एक दिवस मला साक्षात्कार झाला की भारतीय कलाकार भारतीय सृष्टीचे खरे पुत्र आहेत.
 लंडनमध्ये मी एका प्रोफेसरांची हिदी संगीतावरील व्याख्याने अधूनमधून ऐकत असे. व्याख्याने मला कळत असत असे नाही, पण अर्धा तास व्याख्यान झाले म्हणजे उरलेला अर्धा तास उत्तमोत्तम गायक-वादकाचे संगीत फोनोग्राफवर ऐकावयास मिळे व तो मला अपूर्व लाभ वाटत असे. असेच एक दिवस व्याख्यान ऐकत होते. बाहेर लंडनला पडतो तसा चोरून चोरून पाऊस पडत होता. प्रोफेसरमहाशय सांगत होते की, “अमका राग अमक्या वेळी किंवा ऋतूत गावा, असा संकेत आहे. या संकेतांचा त्या रागाच्या आविष्कारांशी संबंध असतोच असे नाही. उदाहरणार्थ, मल्हार राग व पाऊस यांचा संबंध काय आहे, हे कळत नाही."
 मी अर्धवट कान देऊनच व्याख्यान ऐकत होते, पण त्या वाक्याबरोबर मी खडबडून जागी झाले. बाहेरच्या पावसाकडे मी पाहिले खरेच, तो दिसेपर्यंत शोक्सपिअरच्या ओळीतील करुणेचा पाझर व पाऊस ह्यांचा संबंध तरी मला कुठे कळला होता! पाऊस, नेहमीच वरदानासारखा पण शेक्सपिअरने दिलेली विशेषणे पावसाला कशी लागतात हे कुठे मला समजले होते? त्याचप्रमाणे ज्याने माझ्या मायभूमीचा वळवाचा पाऊस पाहिला नाही, त्याला पावसाचा व मल्हाराचा संबंध काय कळणार? वादळावर स्वार होऊन, ढगांचा नगारा वाजवीत, विजेचा लखलखाट करीत दरवर्षी जमिनीला झोडपीत येणारा पाऊस, थेंब अंगावर पडायच्या आधीच लांबून लक्षावधी माणसे चवड्यांवर धावत यावी, असा येणाऱ्या सरींचा आवाज; व छपरे उडवीत, झाडे पाडीत. गारांनी फोडीत आठ तापलेल्या, उत्कंठेने होरपळलेल्या जमिनीला झोडीत, राक्षसी प्रणयाने की प्रलयाने तांडव करीत येणारा पाऊस ह्या महाशयांना काय माहीत?