पान:Bhovara-Iravati Karve.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३२ / भोवरा

झाडाखाली दाट छायेच्या काळ्या चंद्रकळेवर लख्ख प्रकाशाचे गोल गोल कवडसे खडीसारखे चमकतात; पण येथे सावली पडेल इतका लख्ख प्रकाश महिनेच्या महिने पडत नाही.
 एक दिवस मी ह्या उद्यानातून त्या उद्यानात भटकत भटकत सेंट जेम्स बगीच्यात पोचले व तळ्यातील पोहणाऱ्या पक्ष्यांकडे पाहात उभी राहिले. सगळीकडे मंद रुपेरी प्रकाश पडला होता. एकाएकी मला चमत्कारिक वाटले. आपल्याकडे सर्व प्रकाशाचा उगम आकाशात होतो. येथे मला वाटले की प्रकाश खालून वर फाकला आहे. मी परत नीट भोवताली व वर पाहिले. खरेच आकाश अभ्राच्छादित होते. अगदी काळे जरी नसले तरी सूर्याचा मागमूसही नव्हता. खाली तळच्या पाण्यावर व मधल्या दगडावर बर्फाचा पातळ थर साचला होता व त्यातून परावर्तन पावून प्रकाश सर्वत्र फाकला होता. यामुळे प्रकाश खालून वर गेल्यासारखा वाटला. या विशिष्ट प्रकाशात सर्वच रंग आंधळे वाटतात. कधी एखाददिवशी सूर्यप्रकाश पडला, व तोही वसंत ऋतूत फुलांनी बहरलेल्या ताटव्यावरून व हिरव्या कुरणावरून पडला, म्हणजे रंगाने नटलेली सृष्टी डोळ्यांपुढे नाचते. पण तरीही येथल्या सृष्टीतले रंग व आपल्याकडच्या सृष्टीतील रंग ह्यात फार फरक आहे. सर्वच रंग जरा मंद व सौम्य वाटतात. जसा दाट छाया झगझगीत प्रकाश हा विरोध इंग्लंडात दिसत नाही, तशा निरिनराळ्या रंगांतील छटा पण आपापल्या भडकपणाने उठून न दिसता एकमेकांना पूरक व मंद अशा भासतात. इकडच्या चित्रकारांची चित्रे मला ही सृष्टी पाहिल्यावर जास्त आवडू लागली. काळसर पांढुरके पाणावलेले आकाश, तशाच प्रकाशात दिसणारे डोंगर, नद्या व तळी, हिरवी, फुलांनी भरलेली नाजूक रंगाची कुरणे व त्यात लठ्ठ, गोऱ्या गुलाबी गालांची, निळ्या डोळ्यांची व सोनेरी केसांची माणसे. ह्याही सृष्टीची मला मौज वाटे.कारण सर्वच कसे निराळे होते. पण चित्र-मंदिरातील नामांकित चित्रकारांची चित्रे पाहून पाहून किंवा लंडनमधील उद्यानातून हिंडता हिंडत दमले व मी स्वस्थ डोळे मिळून बाकावर बसले की अनाहूतपणे घरची सृष्टी माझ्यापुढे येई.
 उन्हात भाजून निघणारी रेताड जमीन, युगानुयुगे उन्हापावसात उभे राहिलेले, वेडेवाकडे झिजलेले अरवलीचे डोंगर व शेतात काम करणाऱ्या दोन अहिर बाया-लांबून त्यांची तोंडे दिसत नव्हती, पण भडक तांबडी व