पान:Bhovara-Iravati Karve.pdf/131

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / १३१

कसल्याश्या रसायनाने धुऊन साफ करीत होते. धुतलेली इमारत शुभ्र पांढरी तर शेजारीची काळीकुट्ट असा विरोध मोठा मौजेचा दिसे. ह्या काळ्याकुट्ट इमारती नेहमी धुतल्या नाहीत तरी सुंदर दिसाव्या म्हणून खटपट चाललेलीच असते. माझा रस्ता पार्लमेंट स्ट्रीटवरून असे. तेथे निरनिराळ्या सरकारी खात्यांच्या कचेऱ्या आहेत. त्यांच्या समोरून जाताना हिवाळ्याच्या उदास वातावरणात त्या अधिकच काळ्या व उदास वाटावयाच्या; पण एक दिवस पाहते तो रस्त्यावरच्या सर्व खिडक्यांतून निळसर जांभळी आयरिस फुले कुंड्यांतून भरून राहिली होती. वसंत ऋतूतली ही पहिली फुले; आणि मग दर पंधरा दिवसांनी ऋतुमानाप्रमाणे कुंड्या व फुले बदलत. आयरिसनंतर पिवळे धमक डॅफोडिल, त्यानंतर निरनिराळ्या रंगांचे हंड्रेड्स अँड थावजंड्स, ह्याप्रमाणे वसंतातील निरनिराळ्या फुलांची हजेरी तेथे लागायची. काळ्या खिडक्या, आतील सदैव अंधाऱ्या खोल्या, त्यात भर दुपारी दिवे लावून काम करणारी माणसे व बहुधा अभ्राच्छादित असलेले आकाश, या अंधाऱ्या सृष्टीत सूर्यप्रकाशाला बांधून आणून खिडक्यांतून डांबून ठेवण्याची खटपट अजब खरीच! त्या फुलांनी खिडक्यांना शेाभा येते की नाही, ह्या प्रश्नाचा निर्णय मात्र मला शेवटपर्यंत झाला नाही.
 हिवाळ्यातले कित्येक आठवडे येथला दिवस संधिप्रकाशाइतपत उजेडात असतो. ह्या अर्धवट उजेडात् प्रकाशाचा जसा अभाव तसाच छायेचाही. निरनिराळ्या उद्यानातून केवढाले पर्णहीन वृक्ष उभे असायचे; पण एकाचीही सावली खालच्या हिरवळीवर पडायची नाही. आमच्याकडे रखरखीत ऊन असते व त्याबरोबरच अगदी त्याला चिकटून सावली असते. डांबरी रस्ता उन्हाने इतका चकाकतो की दृष्टी ठरत नाही. पण प्रत्येक चालणारे माणूस व धावणारे वाहन आपल्या सावलीनिशी चालत वा धावत असते. दिव्याच्या प्रत्येक खांबाची सावली त्याच्या शेजारी लांब पसरलेली असते. प्रत्येक वस्तूची एक बाजू पोळलेली आणि प्रकाशमय तर दुसरी बाजू छायेची व निवाऱ्याची, असा विरोध सतत दिसतो. आगगाडीतून प्रवास करताना बघावे, उन्हाच्या वेळी, टेलिग्राफच्या तारांवर बसताना पक्षी नेमके खांबाची सावली पडलेली असेल तेथेच खांबाला चिकटून बसलेले आढळतात. पायी चालणारी माणसे घरांची सावली ज्या बाजूला पडली असेल त्या रस्त्याच्या बाजूने चालतात.