पान:Bhovara-Iravati Karve.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३० / भोवरा

त्यात काही थोडा वेळ मात्र राहणारा, दृष्टीला चकविणारा धुक्याचा पडदा-असे आपल्याकडचे धुके. सकाळी उठून पहावे तर महाबळेश्वरी किंवा सिंहगडावर खाली दरी धुक्याने भरलेली असते- तेवढ्यात सूर्य उगवला, की त्या धुक्यावर इंद्रधनुष्ये उमटतात आणि थोडा वेळ इतस्ततः पळून, सूर्य वर आला की धुके पार नाहीसे होऊन गवताच्या पातीपातीवर अनंत दंवबिंदु कोटिसूर्य प्रतिबिंबित करतात. संध्याकाळी धुके पसरले तर तेही रात्र निवळली की नाहीसे होते व रात्रीचे आकाश सर्व ताऱ्यांनिशी चमकत असते. पण लंडनचे धुके म्हणजे औरच असते. आधी वर्षाचे दहा दिवस सुद्धा आकाश निरभ्र नसते. तिकडचे आकाश आपल्या आकाशाइतके उंच कधी वाटतच नाही. कधीही वरती पाहा, काळसर पांढुरके छत जसे सर्व शहरावर घातलेले असते. कोळशावर चालणारे लंडनमधले हजारो लहानमोठे कारखाने व कोळशावर चालणाऱ्या लंडनच्या घरातील लक्षावधी चुली रात्रंदिवस वातावरणात धूर ओकीत असतात. घरातही जरी अनवाणी चालले तरी पाय काळे होतात: कोठल्याही झाडाला हात लावला तर हात काळे होतात. या धुरकट वातावरणात धुके पसरले म्हणजे एरवी डोळ्यांना न दिसणारे कोळशाचे कण जणू दृश्य होतात. काळोख डोळ्यांना दिसतो व हातात धरता येतो. असे धुके वर्षातून एकदोनदा तरी लंडनवर पसरते. पृथ्वीच्या भोवती हवेचे आवरण आहे व आपण त्या हवेच्या तळाशी आहोत या गोष्टी भूगोलाच्या पुस्तकात वाचल्या होत्या. पण त्यांचा प्रत्यक्ष अनुभव लंडनच्या धुक्यात आला. समुद्राच्या तळाशी असलेल्या जीवांना काय वाटत असेल त्याची कल्पना येते. ह्या धुक्याने हाहाकार होती. ब्रिटीश खाडीत बोटीवर बोटी आपटतात. रस्त्यावर गाड्यांचे अपघात होतात. मुले रस्ता चुकतात. म्हातारी-कोतारी, विशेषतः छातीचा विकार असलेली माणसे-बरीच मरतात; पण या विचित्र हवेमुळेच हिटलरला लंडनवर स्वारी करायला संधी मिळाली नाही, असे म्हणतात.
 लंडनमधला धूर शहरातल्या शहरात कोंडतो व झाडे आणि घर वा धुराची पुटेच्या पुटे बसून सर्व इमारती काळ्याकुट्ट होतात. सर्व जगात इतक्या काळ्या पडलेल्या इमारती कोठे पाहिल्या नव्हत्या. राणीच्या राज्यारोहणानिमित्त लंडनची साफसफाई होत होती व लोक मोठाल्या इमारती