पान:Bhovara-Iravati Karve.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / १२९

नकळत भिजवतो. तो इतका सौम्य की पावसातून चालणाऱ्याला समजत सुद्धा नाही. फक्त हवेत आर्द्रता असते. वाऱ्याची झुळूक ओल्या हातांनी गालाला हळूच शिवून जाते. तितक्याच नकळत खालची जमीन हळूहळू पाणी पिते. 'Quality of mercy is not strained' शेक्सपिअरची ही ओळ जणू नव्याने मी अनुभवीत होते.
 इंग्लंडची सगळीच सृष्टी मला नवी होती. मी गेले तो पानांचा रंग पालटून पानं झडायला सुरुवात झाली. केनसिंग्टन व हाइड पार्क या दोन बागांतून मी चालत जाई व मग पुढचा मार्ग बसने जात असे. वाळलेल्या पानांचे ढीगच ढीग बागेच्या कडेला जमविलेले होते. पानझड थांबल्यावर रोज त्या ढिगांना सकाळी आगी लावीत आणि सर्व वातावरण कडवट तिखट धुराने भरून जाई. सकाळच्या थंडीत तो वास व पेटणाऱ्या पाचोळ्याच्या आगट्या मोठ्या सुखदायक वाटायच्या. सगळ्यांत चमत्कार वाटे तो हा की, मोठमोठे वृक्ष पानाशिवाय उभे-कुठे हिरव्या रंगाची छटासुद्धा त्यांवर दिसायची नाही; आणि खाली मात्र थंडी असो वा बर्फ असो, गवताचा गालिचा नेहमी टवटवीत व हिरवाचार असायचा. गवत कोळपून जाईल अशी थंडी इंग्लंडमध्ये पडत नाही आणि गवत पाण्याशिवाय वाळेल असे क्वचितच होते; कारण पाऊस नाही असे काही आठ दिवस जात नाहीत.
 सप्टेंबर-ऑक्टोबर नंतर जवळजवळ रोज पाऊस पडायचा, आणि माझ्या ओळखीचे सर्व लंडनवासी पावसाला शिव्या देत असायचे. मला त्या पावसाची मोठी मौज वाटे. वाटेत चिखल नाही, मजेदार गारवा आणि ४५ मैल चालूनही थकवा नाही. घरनं वर्तमानपत्रं यायची; त्यांत महाराष्ट्रांतल्या दुष्काळाची वर्णने व नगरच्या लोकांची कधीही न संपणारी पाण्याची कटकट-कोणी म्हणाले की तुम्ही कशा पावसाला कंटाळत नाही, तर मी उत्तर देई की, जगात कोठे तरी असा पाऊस पडतो व कायम हिरवेगार राहते, त्याचे मला फार कौतुक वाटते.
 नुसता पाऊसच नाही, लंडनची सर्वच सृष्टी इकडच्या उलटी. आपल्याकडे धुके म्हटले की काही तरी मजेदार संवेदना मनाला होते. पावसाने धुऊन काढलेले प्रसन्न आकाश, सकाळची व संध्याकाळची पडू लागलेली थंडी व दहा मैल लांबचे दिसावे असे स्वच्छ वातावरण आणि