पान:Bhovara-Iravati Karve.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२६ / भोवरा

शेजारच्या डॉक्टरीणबाईंना बोलावलं, त्यांनी सांगितलं की घरगुती उपचारांचं हे दुखणं नाही, म्हणून इस्पितळात नेलं. तिथ शस्त्रक्रिया करण्याच्या आतच मेल्या!" मला माहिती देण्यात आली. “ताईच्या आई काय आक्रोश करताहेत!' कोणीसे कळवळून म्हणाले.
 ‘करतील तर काय झालं. एक गुलाम नाहीसा झाला. कोणालाही वाईट वाटेल!" मी मनातल्या मनात म्हटले, पण मोठ्याने मात्र “सुटली बिचारी!” एढेच शब्द उच्चारले.
 ही दुसरी देणेकरीण. ताई कॉलेजची परीक्षा पास झाली तेव्हा कोणी तिला एका संस्थेत काम करण्याची गळ घातली होती. ती नाकारून ताईने जरा जास्ती पैशांची सरकारी नोकरी पत्करली. तर त्या वेळी कोण गहजब झाला! एका सभेत तिचे नाव न घेता लोकांना समजेल अशा बेताने एक वक्ते म्हणाले होते, ‘मुली बी. ए. झाल्या म्हणजे आपले आयुष्य एखाद्या गरीब संस्थेत न वेचता पैशाकडे पाहतात व मोठ्या नोकऱ्या धरतात. बिचारी ताई वक्त्यांच्या समोर पुढच्या रांगेत बसली होती. संताप, आश्चर्य, अगतिकता व शरम ह्यांनी तिच्या अंतःकरणात काय झाले ते ती कोणाजवळ बोलली नाही. बऱ्याच वर्षांनी मला ते कळले. तिच्या अंगावर आई व सात भावंडे ह्यांचा संसार होता. त्यांचे शिक्षण करता येईल अशा नोकरी तिला हवी होती. आई व भावंडे शिकण्यासाठी एकीकडे व स्वतः नोकरीच्या गावी, असे दोन संसार तिला चालवायचे होते. सर्व भावंडांचे शिक्षण व लग्ने करूनही तिची जबाबदारी व देणे संपले नव्हते. भावाच्या आजारात रात्रंदिवस तिची सेवा चालली होती. दिवसभर नोकरी, रात्रभर जागरण, मधल्या वेळात स्वयंपाक- कोण गुलाम पैसा देऊनही इतक करणारा मिळेल? मिळवता मुलगा घरी आला की दमला म्हणून त्या कौतुक होई, पण ताईला “बस हो, दमलीस-" एवढे दोन शब्दही कधी कोणी म्हटले नाहीत. ज्या बायांनी संस्थांतून कामे केली, त्यांचा बाेलबाला झाला, वर्तमानपत्रातून फोटो आले, समाजसेविका म्हणून सत्कार झाले. शारीरिक स्वास्थ लाभले, प्रतिष्ठा मिळाली, ताईचा त्याग कोणाला दिसला नाही. सगळ्या बहिणींची लग्ने झाली. कोणाच्या मनात येईना, की ताईलाही संसार करावासा वाटत असेल म्हणून. शेवटी शरीराने संप पुकारला आणि ताईच्या कचाट्यातून आपली सोडवणूक करून घेतली.