पान:Bhovara-Iravati Karve.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / १२५

उचलला होता. आई बिचारी महासाध्वी होती. नवऱ्याच्या क्षुल्लक पगारावर आठदहा माणसांचा संसार कसा करी, तिचे तिलाच माहीत.
 मुले हळूहळू मोठी झाली. थोरल्या मुलीचे लग्न झाले, थोरला मुलगा मिळवू लागला, खालची लवकरच आपल्या मार्गाला लागणार असे दिसत होते. तरुण वयात केलेल्या कष्टाचे फळ मिळणार, आत सुखाचे दिवस येणार ह्या आशेत सर्व होती पण ते बिचारीच्या नशिबात नव्हते. थोरला मुलगा कर्ज काढून परदेशात गेला तो परत आलाच नाही. त्याचे कर्ज मात्र कुटुंबाच्या डोक्यावर बसले. आई व वडील दुःखातच गेली. मधल्या मुलाला मध्येच कॉलेज सोडून लहानशी नोकरी पत्करावी लागली. हिने, भावाच्या मदतीने काही शिष्यवृत्त्या मिळवून शिक्षण संपवले व शिक्षण संपल्या दिवसापासून ती व तिचा भाऊ ह्यांनी संकल्प सोडावा त्याप्रमाणे आपल्या आयुष्याचे कुटुंबाला दान केले. कर्जाची फेड करता करता भावाबहिणींचे वय झाले... कोणी तरी वंशाला राहावा म्हणून धाकट्याचे लग्न करून दिले व दोघांनी त्याच्या संसाराला मदत केली. तिच्या त्यागाची सीमा तरी काय, हे दैवाला पाह्यचे होते की काय कोण जाणे... बहिणीची मुले, विधवा भाच्या आणि नातवंडे पण तिच्याच पदरी पडली... आणि जणू काय हे सर्व कमीच म्हणून, ती आता एका निर्वासित मैत्रिणीसाठी दवाखान्यात खेटे घालीत आहे. तिचा विचार करायला लागले की माझ्या विचारांचे पर्यवसान रागात होई. पहिल्याने काही कारण नसता तिच्या दीन अगतिक नातलगांचा राग येई- नंतर परदेशात सुखात असलेल्या भावावर मी चरफडे. शेवटी मला तिचाच राग येई, ‘तिला तरी जरा अंगाबाहेर नसते का टाकता आले?' असे मी घरी हजारदा मनाला विचारी. माझ्या सुखासीन जिवाला तिचा त्याग अगदी असह्य होई.
 विचाराच्या चक्रात मी घरी कधी आले ते समजलेसुद्धा नाही. घरची मंडळी जरा खिन्नच दिसली व लवकरच त्याचे कारणही कळले. “तुला कळलं का ताई गेल्या ते?"
 “म्हणजे? दोन दिवसांपूर्वीच मला दिसल्या होत्या. भावाच्या आजाराची चौकशीसुद्धा केली मी त्यांच्याजवळ. जरा दमल्या भागलेल्या व ओढल्यासारख्या दिसत होत्या, पण आजारी काही नव्हत्या. काही अपघात वगैरे झाला की काय?" मी आश्चर्याने विचारले.
 “त्यांचे संध्याकाळी पोट दुखू लागलं. दोन दिवस घरी होत्या.