पान:Bhovara-Iravati Karve.pdf/123

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
      १३
    डार्विनचा सिद्धांत

 "पृथ्वीवर सगळीकडे जीवनाचा तीव्र झगडा चालला आहे. स्वपोषण आणि प्रजनन हे सर्व जीवनसृष्टीचे अंतिम ध्येय आहे. आपण जिवंत राहावयाचे व आपल्या जीवजातीची संतती-सातत्य-कायम ठेवायचे ह्या प्रयत्नात जग गुंतलेले आहे. जे जीव ही दोन्ही कार्ये करतात, ते जीवनाच्या लढाईत यशस्वी झाले असे म्हणावे, शक्ती, युक्ती व परिस्थिती ह्या तिन्हींच्या जोरावर व्यक्ती- एक एक जीव- हे कार्य करते. ज्यांना साधत नाही, त्या व्यक्ती मरतात. सर्वतया वरील गुणांनी युक्त तेच जीव जगतात..." वर्गामध्ये डार्विनच्या विकासवादाचे विवरण करताना मी सांगितले व माझा तास संपवून घरी परतले.
 वाटेत किती तरी दिवसांनी तिची गाठ पडली. एका हातात औषधाची बाटली, एका हातात भाजीची पिशवी, अशी घाईघाईने ती कुठे तरी निघालेली दिसली. “आजारी होतीस का?"
 “छे ग! माझी ती सिंधी निर्वासित मैत्रीण आहे ना, तिची मुलगी आजारी आहे. तिचं औषध आणायला चालले आहे."
 “आणि ही भाजी कुणासाठी चालवली आहेस बाई?"
 “तुझं आपलं काही तरीच. ही काही दुसऱ्या कुणासाठी नाही. अगदी घरच्यासाठी भाजी आहे बरं!" तिने हसून उत्तर दिले. आणि “मला लवकर गेलं पाहिजे, जाते मी- " असे म्हणून ती पुढे सटकली व मी माझ्या वाटेने चालू लागले.
 भाजी अगदी घरच्यासाठी होती; तरी इतर नव्हते का कुणी ती आणायला? एवढी मुले घरी आहेत, कुणालाच का नसते जाता आले? माझ्या