पान:Bhovara-Iravati Karve.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / १२१

मोठमोठ्याने चाललेल्या हसण्याखिदळण्याने, संभाषणाने मला परत जाग आली. आम्ही जेवलो त्याच चौकात महंतजी व त्यांचा मित्रपरिवार ह्यांचे मोठ्या मजेत, सावकाश, हसतखेळत जेवण चालले होते. पत्त्यांच्या खेळातील हारजितीबद्दल वादविवाद चालला होता. ऐकता ऐकता मला परत झोप लागली.
 रोजच्याप्रमाणे आम्ही सहा वाजता उठलो. दार उघडले तो बाहेर अगदी सामसूम. खोलीतल्या खुजातल्या पाण्याने तोंड वगैरे धुऊन, बिछाना आवरून, सामान बांधून, नीट एकावर एक रचून ठेवले व जरा उघड्यावर जावे म्हणून बाहेरच्या बागेत आलो. गावात सर्वत्र दहा वर्षांपूर्वीच्या भूकंपाची पडझड दिसत होती. देवीचे देऊळ शेजारीच होते; तेथे गेलो. आत एक घागरा नेसवलेली ओबडधोबड मूर्ती होती. देऊळही अगदी जुजबी बांधणीचे होते. त्यांतूनही भूकंपात पडलेला भाग अजूनही दुरुस्त न केलेला होता. ज्या भूमीत अशोकाच्या वेळची व गुप्तांच्या वेळची अप्रतिम शिल्पे सापडतात, तेथेच अशा भिकार मूर्ती घडाव्या हे काय दुर्दैव!
 हा सर्व प्रदेश म्हणजे चंपारनपासून थेट पूर्व बंगालच्या सीमेपर्यंत, निरनिराळ्या रोगांनी पछाडलेला आहे. महंतजी सांगत होते त्यात अतिशयोक्ती नव्हती. तेच रोग पुढे पूर्व किनाऱ्याने सबंध ओरिसा व आंध्राच्या पूर्वपट्टीला व्यापून आहेत. ओरिसात व आंध्रात तर जोडीला आणखी महारोग पण आहे! ह्याच प्रदेशातील जंगल विभागात, विशेषतः समुद्रसपाटीपासून साधारण ८०० ते १००० फूट उंच असलेली ठिकाणे रोगमुक्त आहेत. आज रोग व महापूर ह्यांच्या तडाख्यात सापडलेल्या | प्रदेशातच प्राचीन व मध्ययुगीन संस्कृती फोफावली होती. जंगल विभागात तेव्हाही वन्य जमातींचा काही प्रदेश जमिनीसाठी सदैव हपापलेल्या शेतकऱ्यांनी ताब्यात घेतला; पण एकंदरीने त्या सृष्टीत मोठ्या घडामोडी झाल्या नाहीत. सपाट, सुपीक प्रदेशात मात्र एका काळी समृद्ध राज्ये, मोठा व्यापार, सुंदर शहरे, भरभराटलेली बंदरे होती. वैदिक धर्माचा अभिमानी कालिदास, बौद्ध अश्वघोष व जैन विमलसूरी ह्यांनी आपली काव्ये इथेच लिहिली. ह्याच भूमीवर नालंदाचे विश्वविद्यालय सतत पाचशे वर्षे त्या वेळच्या सुसंस्कृत जगाला विद्यादान करीत होते. त्या वेळीही नद्यांना पूर येत असणारच. भूकंपाचे धक्के बसत असणारच, आताचे आजार त्या वेळीही होते, ह्याची साक्ष वैद्यकावरील ग्रंथ देतात. मग आताच बहुजन