पान:Bhovara-Iravati Karve.pdf/120

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२० / भोवरा

 "इतक्यात कुठची? अजून तास दोन तास अवकाश आहे. जुगलबाबूंच्या सांगण्यावरून तुम्हांला आधी वाढलं." वाढणाऱ्या इसमाने सांगितले.
 "महंतजींच्या घरी कुणी बायकामाणसे नाहीत का?"
 "आहेत की, शेजारच्या वाड्यात ती असतात. अधूनमधून महंतजी तिकडे जातात.”
 “त्यांची जेवणं झाली का?"
 "इतक्यात कशी होतील? पुरुष मंडळींची जेवणं झाली की त्या जेवतील"
 जास्त विचारपूस न करता पुढे आलेले जेवण आम्ही जेवलो. जेवणाच्या बाबतीत प्रवासात असताना आम्ही उंटाला गुरू केले होते. अन्न भेटले की पोटभर जेवायचे. अन्नासाठी कामाचा वेळ गमवायचा नाही; जेवण नाही मिळाले तर तसेच पुढे ढकलायचे, असा आमचा क्रम होता. ह्या प्रवासात तरी कधी चोवीस तास अन्नशिवाय गेले नाहीत व जेवणावर जेवण मिळून कधी अजीर्णही झाले नाही.
 जेवण झाल्यावर परत खोलीत गेलो, पोट भरल्यावर जाईची झोप उडाली होती. ती म्हणाली, “नको रे बाबा हे गंगेचं सुपीक खोरं व इथल्या बायकांचा जन्म! त्या शेजारच्या चार भिंतींत हातावर हात व पायावर पाय ठेवून जेवणासाठी ताटकळत बसायचं म्हणजे कोण कर्मकठीण! बहुतेक आतल्याआत कुजत असतील नाही?"
 “नाही; तसं व्हायच्या आत काळा आजार, मलेरिया वगैरे रोग त्यांना मारून टाकतात!” मी सुस्कारा टाकून म्हटले.
 तिला कसली तरी आठवण झाली. “आपण बंगाली कादंबऱ्यांची भाषांतरं वाचली, त्यात पण पांढरपेशा लोकांची राहणी अशीच रंगवलीआहे, नाही? ते पुरुष पण असेच मध्यरात्री जेवायला येतात व तावर त्यांच्या बायका ताटकळत बसतातसं दिसतं."
 पुढे मी ओरिसात गेले तेथेही असाच काहीसा प्रकार दिसला. दिवसा भयंकर उकाडा म्हणून रात्रीचा दिवस करतात; की आम्हांला विलक्षण भेटले कोण जाणे! संध्याकाळपासून रात्रीच्या जेवणापर्यंतचा बहुतेक वेळ पत्ते खेळण्यात जातोसे दिसते. आम्ही थोड्याच वेळात झोपी गेलो. रात्री बऱ्याच