पान:Bhovara-Iravati Karve.pdf/12

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२ / भोवरा
 

 ऑफिसात नवा कागद केला व जास्ती पैसे देण्याचा करार केला, धनसिंगाने आमच्यावर विश्वास आहे म्हणून सांगितले. परस्परांवरचा विश्वास उडावा असे वर्तन शेवटपर्यंत आमचे झाले नाही; व ह्या मजुरांच्या व चंडीप्रसादच्या बरोबर प्रवास फार संतोषाने झाला. एकंदर प्रवासी कंपन्यांचा अनुभव घेता एवढे मात्र पक्के मत झाले, की त्यांच्या वतीने प्रवास करू नये. प्रवासी व मजूर सगळ्यांनाच बुडवून पैसे काढण्याचा त्यांचा बेत असतो.
 रुद्रप्रयागला मंदाकिनीच्या तीराने पायी चालावयास सुरुवात केली. हिमालयाची सर्वच वनश्री अगदी नवीन होती, म्हणून पाहातपाहात फोटो काढीत, पक्षी दिसला की दुर्बीण लावून न्याहाळीत, नवीन फुले दिसली की ती गोंळा करीत, निरनिराळे दगड खिशांत घालीत, आम्ही वीस दिवस चालत होतो. कोठेही एका दिवसापेक्षा जास्त मुक्काम केला नाही. एकंदर १८० मैल चाललो. पहिला व केदारचा अशा दोन मुक्कामात जरा कमी चाललो; एरवी साधारणपणे रोज दहा ते अकरा मैल चालत होतो. रमतगमत पाच ते सात तास चाल होई. होता होईतो सकाळचेच चालत असू. पण कधीकधी दुपारचीही चाल झाली. केदारच्या वाटेवर रोज बाराच्या पुढे गड़गडायला लागून जोराचा पाऊस यायचा. धनसिंग म्हणायचा, “बाई, अशनी पडल्या तर मरायला होईल !” पण आम्हांला चारपाचदाच गारा पडलेल्या दिसल्या. पाऊस जरी बाराच्या पुढे यायचा तरी ढग दहापासूनच जमायला लागायचे. आम्ही मोठ्या हैौसेने रंगित फिल्मस् घेतल्या होत्या; त्यांचा उपयोग लख्ख ऊन असले तरच करायचा. सूर्य लौकर उगवे. पण दोन्ही बाजूच्या उंच पहाडांतून वर येऊन खालच्या दरीत स्वच्छ प्रकाश पडायला साडेआठ वाजायचे, म्हणजे दिवसाकाठी फोटो घेण्यास फारफार तर दोन तास मिळत.
 रोज दहा मैल चाल म्हणजे नीट कल्पना येत नाही. त्या दहा मैलांत एखादा तरी दोनतीन हजार फुटांचा चढ व तितकाच उतार असे. शिवाय रुद्रपयागपासून केदारपर्यंत आम्ही जवळजवळ दहा हजार फूट उंच चढलो. रुद्रपयाग असेल जेमतेम २००० फूट व केदार आहे ११,७५० फूट. केदारहून मागे परतून नाला घट्टीवर आल्यावर पाच हजार फुटांवर खाली दोन हजार फूट उतरून मंदाकिनी ओलांडून परत पाच हजार फुटांवरून