पान:Bhovara-Iravati Karve.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



भोवरा / ११७

वाईट ह्याची कल्पना नव्हती. रस्त्यावरून चाललो होतो म्हणण्यापेक्षा गाडी एका खड्ड्यातून दुसऱ्या खड्ड्यात जात होती, म्हणणे जास्त बरे झाले असते! गाडीच्या वेगाने धूळ एवढी उडत होती, की दहा पावले मागे काही दिसत नव्हते! आम्ही नेपाळच्या सरहद्दीजवळ चाललो होतो. येथून म्हणे सबंध हिमालयाची रांग दिसते. जाई मोठ्या आशेने डोळे फाडफाडून बघत होती. सबंध हिमालय काय पण क्षुद्र टेकडीसुद्धा कुठे दिसत नव्हती. पाहावे तिकडे सपाट प्रदेश व धूळ. “रात्री धूळ खाली बसली की पहाटे कदाचित् पर्वताच्या रांगा दिसतील," असे मी म्हटले.
 जुगलबाबू उत्तरले, “छे! आता पाऊस पडून गेल्याशिवाय धूळ खाली बसायची नाही! आता तर आपण वसंतऋतूत आहोत. अजून उन्हाळ्याबरोबर धूळ वाढतच जाणार. जसे दिवस जातील तसं वातावरण धुळीनं धुंद होईल"
 ते पुढे म्हणाले, “आपण जे शहर सोडलं ते पूर्वीचं वैशाली. आता जात आहोत तिथे सीता सापडली व तिथून तीन मैलांवर नेपाळहद्दीत जनकपूर म्हणजे पूर्वीची मिथिला आहे असं म्हणतात"
 गंगेच्या खोऱ्यात पावलापावलावर प्राचीन इतिहासाच्या खुणा आहेत. कोठेही खणा, वैदिक देवतांच्या किंवा बुद्धाच्या मूर्ती सापडतात. ह्याच वाटेने विश्वामित्र रामलक्ष्मणांना घेऊन जंगलातून मिथिलेला गेला असणार; नंतर हजार वर्षांनी वैशंपायनांशी भांडण झाल्यावर याज्ञवल्क्य ह्याच वाटेने त्या वेळच्या जनकराजाकडे गेले असणार; परत तीनशे वर्षांनी त्याच वाटेने माहेरी जाताजाता मायादेवी बाळंत होऊन बुद्धाचा जन्म झाला असणार; ह्याच वाटेने जाऊन कोसलराजा पसेनदीच्या मुलाने शाक्य कुलाची कत्तल केली. बुद्ध, अशोक, चाणक्य, चंद्रगुप्त, गुप्तसम्राट् व कालिदास-विदेह व मगधाच्या परिसरात प्राचीन भारताच्या इतिहासाची किती तरी उज्ज्वल पाने लिहिली गेली. जुगलबाबूंच्या उद्गाराने माझ्या विचारांची साखळी तुटली. "ही नदी आपण ओलांडतो आहोत ना, तिचं नाव मनुस्मारा” गतेतिहासात गुंतलेल्या माझ्या मनाला एक आश्चर्याचा व आनंदाचा धक्का बसला. विदेहाचा इतिहास मी प्रभू रामचंद्रांपर्यंतच नेत होते; पण येथे तर थेट मनूपर्यंत ह्या लोकांनी पोहचवला की! मनूचेसुद्धा स्मरण यांनी ठेवले आहे!
 नदी ओलांडून आम्ही गावात शिरलो व एका मोठ्या आवारातून