पान:Bhovara-Iravati Karve.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११६ / भोवरा

 “आता स्वतंत्र गाडी मिळाली आहे; आपल्याला ‘रीघा' ला पोचायला हरकत नाही.” मी उद्गारले.
 "ते शक्य नाही. आपण पोचल्यावर एका तासात ही व्यवस्था झाली असती तर पोचलो असतो. आत दुपार उलटली आहे आणि मैलांच्या हिशेबानं अंतर जरी थोडं असलं तरी रस्ता इतका खराब आहे, की सीतामढीला पोचायलाच संध्याकाळ होईल" जुगलबाबू म्हणाले.
 “आणि ह्या सगळ्या घोटाळ्याला कारण ते कलेक्टर!" जाई म्हणाली, “पहिल्याप्रथम आपल्या दाराशी उभं करावयास तयार नव्हते आणि मग क्षमा मागतामागता व पाहुणचार करताकरता पुरेवाट! मला शुक्रवारच्या कहाणीचीच आठवण झाली. फराळाचं खाऊ नये, एकएक घास उचलून दागिन्यांवर ठेवावा असं वाटतं होतंस.”
 “अग, दागिन्यांवर नाही, गव्हर्नरसाहेबांच्या पत्रावर !" मी हसून उद्गारले. पण जाईचे बोलणे संपले नव्हते, “इतका घोटाळा करून ठेवला आणि तरी तू आपले त्यांचे आभार मानीत होती.”
 “हे बघ, जायले! तू त्या बिचाऱ्या कलेक्टरच्या दृष्टीनं विचार कर पाहू जरा, कलेक्टरला आधीच काम पुष्कळ असतं; पण हल्ली रेशनच्या दिवसांत तर ते किती तरी वाढलं आहे. पूर्वी कलेक्टर जिल्ह्याचा सर्वाधिकारी असे. आपल्या समजुतीप्रमाणं तो काम उरकीत असे व वरिष्ठांपुढे कामाचा जाब देत असे. हल्ली जिल्ह्यातील प्रत्येक काँग्रेस पुढारी त्याचा वरिष्ठ बनला आहे; त्यांच्या हस्तक्षेपामुळे कारभार करणं जड जात, एवढंच नव्हे, तर चटचट कामाचा उरकच होत नाही. त्याशिवाय पाहिलंसच, की हा मिनिस्टर आला, तो मिनिस्टर आला म्हणजे स्वागताची केवढी जंगी तयारी करावी लागते ती! आणि त्या सर्वांवर कळस म्हणून की काय, आपल्यासारखी आगंतुक माणसं गव्हर्नराकरवी पत्र पाठवून येतात आणि त्यांच्या दृष्टीनं अँथ्रोपॉलॉजीसारख्या निरर्थक कामात त्याचा वेळ घेतात. वेळात वेळ काढून अनिच्छेनं का होईना त्यांनी आपला पाहुणचार केला; एक गाडी देऊन आपल्याला पुढच्या मुक्कामावर रवाना केलं; हा त्यांचा व त्यांच्या बायकोचा उपकारच नाही का?"
 ‘बरं बाई, तुझ्या म्हणण्याप्रमाणं का होईना!' अशा अर्थाचा चेहरा करून जाई स्वस्थ बसली. रस्ता वाईट हे आधी समजले होते; पण तो किती