पान:Bhovara-Iravati Karve.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / ११५

"कलेक्टरसाहेबांना माझे प्रणाम सांगा. मी परत येताना वेळ झाल्यास त्यांना भेटेन; पण आता येण्यास मला वेळ नाही.” तो परत जाऊन पाच मिनिटे होतात, तो खुद्द कलेक्टरच आले. पाटण्याहून पाठविलेले पत्र त्यांच्या हाती कारकुनाने दिलेच नव्हते. ते आता हाती पडले. त्यांनी आग्रह केला, की मी उतरलेच पाहिजे, त्यांच्या घरी चहा घेतलाच पाहिजे वगैरे. अर्ध्या तासापूर्वी, कचेरीत साहेब नाहीत म्हणून त्यांच्या घरी गेलो होतो व पाचच मिनिटे गाठ पडेल का, म्हणून चौकशी केली होती, तर त्यांच्या बायकोने नोकराकरवी ‘गाठ पडणे शक्य नाही', म्हणून निरोप पाठवला होता; म्हणून आमची आम्ही व्यवस्था केली, तर आता हे साहेब उतरून घ्यावयास आले; मला राहण्याचा आग्रह करू लागले. दुसऱ्या दिवशी कोणी मिनिस्टर येणार, म्हणून गुढ्या-तोरणे उभारणे चालले होते. ह्या धांदलीत माझे काम होण्याची शक्यता नव्हती, म्हणून मी गाव सोडून जात होते. शेवटी त्याच दिवशी मोटरने मला सीतामढीस पोचविणार असाल तर उतरते, असा वायदा करून उतरले. एक पट्टेवाला पुढे, एक मागे अशा थाटात आम्ही कलेक्टरच्या बंगल्यात पोचलो. कलेक्टरीणबाई बंगल्याच्या फाटकापाशी सामोऱ्या आल्या; मोठ्या अगत्याने दिवाणखान्यात घेऊन गेल्या. तेथे चहाफराळाची व्यवस्था मोठी सुंदर युरोपीय पद्धतीवर केली होती.
 मी आपली बोलत होते. जाई काही बोलेना न खाईना. स्वारी जरा घुश्शात होती. मी सांगितले, “बाई, अन्न पुढं आलं आहे, थोडं खाऊनपिऊन घे. आज संध्याकाळी मुक्काम कोठे होणार, काय खायला मिळणार काही पत्ता नाही. सकाळी सात वाजता खालं. आता दोन वाजून गेले आहेत, वेडेपणा करू नकोस." तसे तिने पण खाल्ले.
 कलेक्टरीणबाई म्हणत होत्या, “ह्यांना उद्याची तयारी करायची आहे; आमची मोटर काही देता यायची नाही; दुसऱ्या कुणाची मिळते का पाहतो आहोत.”
 मी म्हटले, “अहो, आम्हांला खराब रस्त्यानं जायचं, उगाच तुमची काय किंवा दुसऱ्या कुणाची काय, चांगली गाडी नकोच मुळी. एखादी जुनी गाडी, जीप, माल-टूक काही चालेल.” त्याबरोबर बाई खूष झाली.
 तिने बाहेर कलेक्टरसाहेब होते त्यांना तसे कळवले व थोडक्याच वेळात जीपचा एक लहानसा ट्रक दाराशी येऊन उभा राहिला. आम्ही पण निघालो. जाताना बाईंचे व साहेबांचे आभार मानले व गाडीत बसलो.