पान:Bhovara-Iravati Karve.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / ११३

गमावून बसली होती! ज्यांना वेदांचे एक अक्षर माहीत नव्हते; ज्यांना संस्कृताचा गंध नव्हता; ज्यांना इतिहास माहीत नव्हता, असे पाटण्याचे हजारो लोक मगध सोडून एक दिवसाचे तरी पुण्य गाठी बांधण्यासाठी विदेहाला चालले होते! जुन्या समजुती उराशी बाळगणाऱ्या ह्या लोकांना म्हणावे तरी काय? सोनपूरच्या जत्रेतून येणारी एक आगबोट माणसांच्या गर्दीमुळे व उतरण्याच्या धांदलीमुळे नुकतीच बुडाली होती. पण एकीकडे तोंडाने त्या घटनेबद्दल चर्चा करीत लोक आपापली गाठोडी घेऊन पलीकडच्या तीरावर त्याच धांदलीने निघाले होते.
 एक क्षणभर माझे मन विषादाने व धिक्काराने भरून गेले. दुसऱ्या क्षणी वाटले, मी माझ्याकडे नुसता मोठेपणा घेत आहे. मला विदेही जनकाची माहिती होती. पाटलीपुत्राचा इतिहास मी वाचला होता- पण माझी निव्वळ पुस्तकी माहिती होती. हे हजारो लोक तो इतिहास जगत होते. ज्यांना मी जुन्या समजुती समजले, त्या जुन्या नव्हत्याच मुळी. त्या आजच्या जिवंत भावना होत्या. दुसऱ्या देशांतून जुन्या कल्पना नष्ट होतात व नव्या येतात; पण भारताच्या भूमीत जुने अमर व अजर असते.
 उतरायचा घाट जवळ आला तसतसे बसलेले लोक उठून उभे राहिले. "यंदा उतरायचा घाट दोन फर्लांग पुढे गेला आहे." लोक म्हणत होते. जुगलबाबूंनी परत एकदा समजावून सांगितले, “गंगेने गेल्या वर्षी प्रवाह बदलला म्हणून आगगाडीचे स्टेशन जरा लांब न्यावे लागले. स्टेशनजवळच उताराचा घाट आहे.” परत एकदा पुस्तकी ज्ञान व अनुभव ह्यांतील फरक लक्षात आला. वाळूने भरलेल्या जवळजवळ सपाट मैदानातून वाहणारी गंगा व तिला मिळणाऱ्या इतर नद्या ह्या शाप की आशीर्वाद अशी भ्रांत का पडते हे समजायला गंगा-किनाऱ्यावरच आले पाहिजे. ते चैत्राचे दिवस होते. गंगेचे पाणी कमी झालेले होते. गंगा धीरे धीरे वाहत होती. पात्राला रुंदी खूप होती; पण त्या मानाने खोली नव्हती. ठिकठिकाणी पात्रात वाळू साचून लहानलहान बेटे झाली होती. पाण्याच्या पलीकडे अर्धा मैल रेती होती व काठ तर इतके सखल होते, की पात्र व किनारा ह्यांतील फरक चटदिशी लक्षात येत नव्हता. त्या वाळूवरच गाडीचे स्टेशन होते. स्टेशन कसले? गाडी उभी होती तिथपर्यंत रूळ घालून बांबूच्या मांडवाखाली तिकिटघर होते. तिकिटे काढून गाडीत बसलो. पंधरा मिनिटांनी गाडी सुटायची होती. मी भोवताली पाहिले तो