पान:Bhovara-Iravati Karve.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



      १२
     युगांतर

 बोटीत इतकी गर्दी झाली होती, की उभे राहायला जागा नव्हती. "रोज असते का हो एवढी गर्दी? जास्त बोटी तरी सोडाव्यात." असे मी म्हटल्यावर माझ्या बरोबरच्या गृहस्थाने सांगितले, की काही पर्वणीनिमित्त ही सर्व मंडळी पलीकडे गंगास्नानाला चालली आहेत. मला जास्तच अचंबा वाटला. पाटणा शहर गंगेच्या किनाऱ्यावर वसले आहे. इतकेच नाही, तर त्या शहराला रुंदी जवळजवळ नाहीच. लांबी मात्र चांगली दहा मैल आहे! मला वाटते, शहराचा कुठचाही भाग नदीपासून अर्ध्या मैलापेक्षा लांब नसेल. दहा मैल लांबीचा नदीकिनारा घराच्या अंगणात असताना बोटीत बसून पलीकडच्या तीरावर आंघोळीला जायचे प्रयोजन काय, ह्याचा मला उलगडा होईना.
 जुगलबाबूंनी सांगितले, “अहो, इकडच्या किनाऱ्यावर आंघोळ केली तर माणूस गाढवाच्या जन्माला येतो." तरी माझ्या डोक्यात प्रकाश पडेना; तेव्हा त्यांनी पुढे सांगितले ‘पाटण्याचा किनारा 'मगध' देशात येतो. पलीकडे ‘विदेह'आहे."
 आता मला उमगले; पण माझे आश्चर्य मात्र दसपटींनी वाढले. विदेह पुण्यभूमी होती. विदेही जनकाने त्या भूमीत अग्नीची स्थापना केली होती. आर्यांच्या जुन्या वसाहती गंगेच्या उत्तर तीरावर होत्या. मगध तर पहिल्यापासून पाखंडांचा देश. पाटलीपुत्रात नाटपुत्त वर्धमानाने जिनधर्माला परत एकदा भरभराटीला आणले. पाटलीपुत्रातच बुद्धधर्माची विजया पताका फडकली. मगध वैदिकांचा देश नव्हता; मगधात राहणे पुण्यप्रद नव्हते. परम मंगल गंगासुद्धा मगधाच्या किना-यावर आपले मंगलत्व