पान:Bhovara-Iravati Karve.pdf/111

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / १११

पाण्यासाठी, चाऱ्यासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या डोंगराकडे चाललेल्या असतात. सगळ्यांचा मंत्र एकच- चरैवेति चरैवेति।
 आणि ह्याच सुमाराला शेते पिकली म्हणजे त्या उघड्या दौलतीवर डल्ला मारायला, दिवाळीच्या आनंदात असलेल्या शहरवासियांकडून काही मिळाले तर पाहावे म्हणून बहुरूपे, जोशी, फासेपारधी, कोल्हाटी, माकडवाले हे पण रस्त्यावर दिसू लागतात, गुडुम्-गुडुम्-गुडुम्. बापूराव भागूबाई ही गेल्या वर्षी नाहीशी झालेली जोडी आपल्या साखळीला हिसके देत, पोरांना वाकुल्या दाखवीत परत पुण्याच्या रस्त्यावर आपल्या संसाराच्या परवडीचे प्रदर्शन मांडीत हिंडू लागली. गुडुम्-गुडुम्-गुडुम् नंदीबैल पैसा मागत येतो.
 ...आणि ही सगळी हालचाल पाहिली म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष योनीतील पशुपक्ष्यादी सगळ्या भटक्या पूर्वजांचे रक्त माझ्या शरीरात उसळून उठते. मी पण बांधाबांध करते व प्रवासास निघते... लोकांना वाटते, बाई संशोधनकार्याला निघाल्या म्हणून!

१९५४