पान:Bhovara-Iravati Karve.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११० / भोवरा

जागी झाले. आम्ही उतरलो होतो तेथे ह्या झाडावरून त्या झाडावर पक्षी पिऊऽऽ अशी एकमेकांना साद देत होते. शेवटी उजाडल्यावर बाहेर जाऊन पाहिले तो काय आश्चर्य! पुण्यात पाहिले तसे सोन्याचे पक्षी झाडावर बोलत होते. सोन्याला नुसता जीवच आला नव्हता, तर कंठही फुटला होता! हे पक्षी वसंतात ओरिसात येतात व तिकडे त्यांना ‘हलदी बसंत' म्हणतात. कुठे सोन्याची प्रभा न कुठे हळदीचा पिवळेपणा! मी जेव्हा ह्या पक्ष्यांना पहिल्यांदा पाहिले तेव्हा आश्चर्याचा भर ओसरल्यावर मला अगदी खात्री वाटली का नळराजा नेसते धोतर घेऊन ज्या पक्ष्यांना धरायला धावला ते हेच पक्षी असले पाहिजेत. पण महाभारतातही त्यांना काहीच नाव दिलेले नाही.
 ह्या शरत्कालीन भ्रमंतीत फक्त पक्षीच असतात असे नाही. तर इतरही प्राणी वाटचाल करू लागतात. एक दिवस सकाळी पुणे-मुंबई रस्त्यावर तट्टावर बसून चाललेल्या बायका पाहिल्या. भांडीकुंडी, पोरेसारे सर्व चालली होती. ही आघाडीची मंडळी होती. दहा-अकरा वाजता कुठेतरी पाणी व सावली बघून ती थांबतील व सैंपाक करून ठेवतील तो मागूनची मंडळी येणार. ही मागूनची मंडळी कॉलेजात जाताना भेटली आणि कुठे; तर मालधक्क्याच्या रस्त्यावर अगदी ऐन ऑफिसच्या वेळेला. दोनचारशे शेळ्यामेंढ्या पन्नासपन्नासाच्या गटाने शिस्तीत हाकीत धनगर चालले होते: काळेकभिन्न, अंगात मळकट सदरे, ते इतके खाली, की लंगोटीच्या त्रिकोणाचे फक्त टोक तेवढे पुढे दिसत होते. धोतर अंगावर घेतलले बरोबर त्यांच्यासारखीच काळीसावळी, हसतमुख, गुटगुटीत पोरे, चाैक ओलांडायला त्यांना चांगली दहा मिनिटे लागली. तोवर शेकडो सायकली, दहाबारा मोटरी, दहाबारा मोटरसायकली अडून बसलेल्या. एका बाजूने मालधक्क्यावरून माल भरून मोठाले माल ट्रक व बैलगाड्या ह्यांचा तांडा येऊन उभा राहिलेला; आणि दुसऱ्या बाजूने पोलिसाने रस्ता खुला दिल्यामुळे धनगर व शेळ्यामेंढ्या जात होत्या. पुण्याच्या पूर्वेकडच्या सर्व रस्त्यातून ह्या काही दिवसांत कळपच्या कळप पश्चिमेकडे जात असतात. हिंगण्याच्या रस्त्यावर, सिंहगडच्या रस्त्यावर, लोणावळ्याच्या रस्त्यावर त्यांच्या बायका मारे सैंपाकपाणी करीत असतात व नगर रस्ता, सोलापूर रस्ता ह्या मार्गे येऊन टिळक रस्ता, डेक्कन जिमखाना, स्टेशन रस्ता अशा सर्व रस्त्यांवर शेकडो शेळ्यामेंढ्या पूर्व महाराष्ट्रातील कोरडी, वृक्षहीन मैदाने सोडून