पान:Bhovara-Iravati Karve.pdf/11

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भोवरा / ११

 डून नावाप्रमाणे खरोखरीच एक द्रोण आहे. चारी बाजूंनी पाच ते सात हजार फूट उंचीचे पर्वत आहेत; व मध्ये रानात वसलेले गाव आहे. हिवाळ्यात म्हणे ह्या पर्वतांच्या माथ्यावरून बर्फ असते. आता उन्हाळ्याच्या धुंद वातावरणात पर्वतांची भुते छायेसारखी भोवताली दिसत होती व त्यांची रूपरेषा स्पष्ट दिसली नाही तरी त्यांची आग मात्र चांगलीच जाणवत होती. फरक एवढाच, की उत्तर भारताच्या सपाट मैदानात पांढरी आग होती आणि येथे हिरवा उन्हाळा होता; त्यामुळे निदान डोळे तरी निवत होेते.
 डेहराडून ते हृषीकेश, हृषीकेश ते देवप्रयाग, देवप्रयाग ते कीर्तिनगर कीर्तिनगर ते श्रीनगर (काश्मिरातले नव्हे, गढवालची जुनी राजधानी), श्रीनगर ते रुद्रप्रयाग हा सबंध प्रवास अगदी स्पष्ट आठवतो; पण त्या आठवणी काही विशेष सुखदायक नाहीत. गर्दी, धूळ, उकाडा, भिकाऱ्यांचा आणि पंडयांचा ससेमिरा, यात्रा कंपन्यांची निरनिराळी लबाडी, काही चारदोन देवळे सोडल्यास गलिच्छ भिकारी, देवळे व त्यांचे लोचट दलाल, बस-कंपन्यांची बेपर्वाई व त्यांच्या नोकरांचा उद्धटपणा- ह्या सर्वांना तोंड देऊन यात्रा पुरी करणाऱ्या लोकांच्या धीमेपणाचे, सोशिकपणाचे व श्रद्धेचे कौतुक करावे तेवढे थोडे! आणि शेपूट तुटलेल्या कोल्ह्याच्या मुत्सद्देगिरीने नव्हे, तर अगदी मनापासून सांगते, की एवढा सर्व त्रास सोसूनही बद्री व केदारला जाणे शक्य असेल तर माणसाने आयुष्यातून एकदा तरी जाऊन यावे.
 ज्या कंपनीच्या मार्फत प्रवास केला त्यांनी आमच्याबरोबर स्वैपाक करण्यासाठी चंडीप्रसाद म्हणून एक ब्राह्मण व धनसिंग आणि वीरसिंग म्हणून दोन बोजेवाले दिले. ‘सामानाचं वजन करा, म्हण जास्ती वजन भरल्यास सामान काढून ठेवू’ म्हणून तीनतीनदा सांगूनही तसे न करता, ‘सर्व ठीक आहे; तुम्ही चालू लागा’ असा इशारा मिळाला व आम्ही चालू लागलो. रुद्रप्रयागला बस सोडून पायी प्रवासाला सुरुवात झाली तो, ‘साहेब, सामानाचं वजन करा,’ म्हणून धनसिंगाची भुणभूण सुरू होती. रुद्रप्रयागाला कुलीचे एक ऑफिस आहे, तेथे थांबून सामान वजन केले. आमच्या मॅनेजरने कुलीजवळ कराराचा कागद दिला होता. त्यात वजन बरेच कमी लिहिले होते व अर्थात मजुरीही कमी लिहिली होती. तेव्हा त्या