पान:Bhovara-Iravati Karve.pdf/108

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०८ / भोवरा

वाटून मी क्षणभर थांबले व एक पंखाची जोडी दूर जाते तो दुसरी आली, तिसरी आली, पांढरे पोट व काळसर निळे लकलकणारे पंख असलेले हे पाकोळीच्या जातीचे ‘स्विफ्ट' नावाचे पक्षी हिमप्रदेशातून आलेले पाहुणेच होते. ते म्हणे, युरोपातील आल्प्स पर्वतावरून इकडे येतात! ते चांगले फेब्रुवारी, मार्च- अगदी माघ संपेपर्यंत इकडे दिसतात. आपल्याकडल्या पाकोळ्यांचे हे जातभाई आकाराने मोठे असतात व पंखांचा रंगही जास्त सुंदर असतो. त्यांचे इंग्रजी नाव त्यांच्या वेगाने उडण्यावरून पडलेले आहे. आपल्याकडचे पाकोळी नाव कसे पडले ह्याची उपपत्ती डॉ. मल्हारराव आपटे ह्यांनी ह्या पक्षांच्या दुसऱ्या एका गुणधर्मावरून दिली आहे. पाकोळ्या कधी जमिनीवर किंवा झाडाच्या डहाळीवर बसत नाहीत. त्यांची मातीची घरटी नदीकाठच्या उभ्या दरडीमध्ये किंवा उभ्या खडकावर किंवा घराच्या भिंती किंवा छपरांमध्ये असतात. त्यांचे पाय ‘पांगुळलेले' म्हणून त्या पाकोळ्या असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पण मला ते तितकेसे पटत नाही. त्या पक्ष्यांची कोठची एक क्रिया लक्षात राहात असेल तर ती त्यांच्या उडण्याची. जेव्हा पाहावे तेव्हा ते आकाशात उडत असतात. हवेतल्या हवेत सारखे आपल्या उडत्या भक्ष्यावर झेपा घालीत असतात व उडताउडता हवेतच ते त्या भक्ष्याचा फन्ना उडवतात. संध्याकाळी पन्नासपन्नास शंभरशंभर पाकोळ्या उंच आकाशात मजेत घिरट्या घालतात व एक विशिष्ट आवाज करतात. हे पक्षी पांगळे आहेत, अपंग आहेत असे कधी मनातसुद्धा येत नाही. बागेतल्या फुलपाखरालासुद्धा आपण पाकोळी म्हणतो ते काही त्याच्या पांगळेपणामुळे नाही. पाखरू हा शब्द पख म्हणजेच संस्कृत ‘पक्ष' ह्यापासून आलेला. तसाच पाकोळी हा शब्दही पक्ष शब्दापासून आलेला वाटतो. सदैव पंखावर असते ती पाकोळी.
 युरोपात थंडी पडू लागली म्हणजे कीटक नाहीसे होतात व हे पक्षी दक्षिणेकडे येऊ लागतात. हस्ताचा पाऊस पडून गेला म्हणजे वाळव्यांना पंख फुटतात व अशा लक्षावधी वाळव्या आठ दिवस सर्व वातावरण भरतात आणि शेकडो पक्षी काही हवेत, काही जमिनीवर त्यांना खात असतात. त्यांच्यातच हे पाहुणे पण अधूनमधून दिसतात.
 दिवाळीनंतरच्या एखाद्या दिवशी मजेत थंडी पडलेली असावी, सकाळी उठून पाहावे तो टेलिफोनच्या तारा लहानलहान पक्ष्यांनी भरून गेलेल्या