पान:Bhovara-Iravati Karve.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०६ / भोवरा

वातावरण इतके स्वच्छ होते की हिमनद्यांवरील बर्फ हाताने उचलावे इतके जवळ वाटत होते. माझे मन आनंदात वाहात होते. वातावरणातील धूळ नाहीशी झाली होती- माझे मनही प्रसन्न होते. मोठ्या कष्टाने मी परत फिरले. परत देवाच्या पाया पडले व बसमध्ये येऊन बसले. सबंध वाटभर ती पर्वतांची रांग दिसत होती. हिमनद्यांमागून हिमनद्या दिसत होत्या. काल ह्या होत्या कोठे? आज मी पाहते ते खरेच आहे ना? असे सारखे मनात येई. गावात आल्यावर हे दृश्य लोपले. मी स्टेशनवर विश्रांती घेतली. डोळे मिटून खोलीत पडल्या पडल्या वैजनाथच्या मागच्या डोंगराचा देखावा आठवून मन भरून येत होते. पाच वाजता गाडीत बसले. गाडी सुरू होऊन स्टेशनच्या बाहेर आली व मी सहज खिडकीतून बघितले. तो काय आश्चर्य, तीच पर्वताची रांग सबंधच्या सबंध दिसत होती. सकाळी रस्त्याने येताना पर्वतश्रेणीचा एक एक तुकडा डोळ्यांसमोर येत होता. आता मात्र पंचवीसतीस मैलांची रांग एकसंध दृष्टीसमोर होती. सूर्य खाली गेला तसतशी सोनेरी, गुलाबी छटा पांढऱ्या बर्फावर पसरली. एक शिखर नाही- सबंध शिखरांची रांग दिसत होती. सूर्य खाली गेला तरीही अंधुक उजेडात पांढरे बर्फ चमकत होते. दर मिनिटाला पालटणारे ते रम्य, भव्य चित्र प्रकाशमय होते. सौंदर्य विश्वरूपाने माझ्यापुढे उभे होते आणि मी वेड्यासारखी ते अनंतरूप माझ्या द्रोणाएवढ्या ओंजळीत, मुठीएवढ्या हृदयात व चिंचोक्याएवढ्या डोळ्यांत साठवण्याचा प्रयत्न करीत होते.

१९५९