पान:Bhovara-Iravati Karve.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / १०३

 पहिला प्रवास अंधारातच झाला. गाडी कुलूच्या अरुंद रस्त्याला लागली व आम्ही अगदी बियासच्या काठाकाठाने जाऊ लागलो. येथे विपाशाला बियास म्हणतात किंवा ब्यासा-प्यासा असेही कानांना ऐकू येते. तिचा संबंध व्यासांशी जोडतात! विपाशा, नावाप्रमाणेच विपाशा खरीच! तिने वशिष्ठांचे पाश तोडले की नाही कोण जाणे; पण स्वतः मात्र खळाळत मुक्त वाहते आहे. दरी जसजशी अरुंद होते, तसतसा दोन्ही बाजूंच्या पर्वतांच्या भिंतीतून निनादल्यामुळे तिचा आवाज इतका वाढत जातो की बोलणेही अशक्य होते. विपाशा मोकाट धावणारी. शतद्रू (शंभर) अफाट धावणारी. इरावती व सरस्वती पाण्याने भरलेल्या, दशद्वती- दगडाळ. काय नावे आहेत! मध्य आशियाच्या निर्वृक्ष कोरड्या गवताळ माळावरून दक्षिणेकडे आलेल्या आर्यांना या नद्या पाहिल्यावर काय वाटले असेल ते नावांवरून प्रतीत होते. वाहत्या प्रवाहाला ‘नदी' म्हणायचे हेसुद्धा गमतीदार नाही का? आर्यांच्या भाईबंदात अशा प्रवाहांची नावे मी आठवायला लागले. जर्मन म्हणतात Fluss (वाहणारी), फ्रेंच म्हणतात Fleuve (वाहणारी), इंग्रज म्हणतात River (तीर असलेली, तटिनी) आपण म्हणतो नदीआवाज करणारी! खरंच, मी जर्मन नद्या अगदी उगमापासून पाहिल्या. त्या कशा गवतातून, झाडांतून लपून छपून वाहतात. हिमालयातील नद्यांप्रमाणे अव्याहत आवाज करीत त्या धावत जात नाहीत. हिमालयात प्रवास करताना या नद्यांच्या आवाजाची इतकी सवय होते की त्या टापूबाहेर गेले की पहिल्याने चुकल्याचुकल्यासारखेच होते. विलायतेतील मंदगामी मुक्या नद्या पहिल्या म्हणजे हिमालयातील प्रवाहांना नदी हे नाव सार्थ वाटते.
 दहा वाजता कुलूचे मैदान लागले. स्टॅडवर उतरले. तेथेही कोणी नव्हते. आता काय करावे? तेथेच उभी राहून परतणारी गाडी पकडण्याखेरीज गत्यंतर नव्हते. कुलूला हॉटेल वगैरे काही नाही. अर्धा तास उभी होते, एवढ्यात एक माणूस धावत आला. “बाईसाहेब, अशाच जाऊ नका. सरकारी विश्रांतिगृहात या.” मी त्याच्यामागून चालू लागले. त्याने मला खोली दाखविली व सकाळच्या न्याहारीची व्यवस्था केली. मी म्हटले, “बाबा, आमची पत्रे, तारा तुम्हांला मिळाल्या नाहीत का?"
 तो म्हणाला, “जिल्ह्याच्या मुख्यांकडे पाठवून दिल्या, त्या आहेत लाहूलला, आणखी पंधरा दिवस येणार नाहीत.”