पान:Bhovara-Iravati Karve.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०० / भोवरा

तारा व पत्रे जाऊनही कोणी कसे न्यायला आले नाही, हे काही समजेना. आता आज कुलूला पोचते का नाही कोण जाणे? सुदैवाने जागा खिडकीजवळची मिळाली होती. हवा दिल्लीच्या व राजपूरच्या मानाने जरा गार होती, पण वातावरण मात्र धुळीने भरलेलेच होते.
 रस्त्याच्या बाजूने शेते व फळबागा होत्या. सगळीकडे हिरवेचार होते पण विशेष थंड नव्हते. सबंध वाटभर म्हशींचे कळपच्या कळप व त्यांमागून कुटुंबेच्या कुटुंबे जाताना भेटत होती. फाटकेतुटके कपडे पण बळकट सुरेख माणसे. कोण बरे ही? चौकशी करताना कळले की ही सर्व माणसे गुजर जमातीची होती. भाकड म्हशी, गाभण म्हशी, लहान रेडके हिमालयातील रानांत हाकून न्यावयाची व हिवाळ्याच्या सुमाराला परत येऊन काही विकायची, काही घरी ठेवून दुधाचा धंदा करावयाचा, असा या लोकांचा उद्योग असतो. आपल्या महाराष्ट्रात अशा तऱ्हेचा उद्योग करणारे लोक आहेत. ते बहुधा ‘गोसावी' जातीचे असतात- कोकणात त्यांना ‘हेडे' म्हणतात- आपल्याकडचे हिंदू असतात. गुजर बहुतेक मुसलमान असतात. त्यांच्या कळपात गायी काही दिसल्या नाहीत. सर्व वाटभर हे लोक दिसत होते. सर्व संसार बरोबर घेऊन चालले होते. काळ्या लठ्ठ म्हशींना काठ्यांनी रस्त्याच्या मधून बाजूला हाकून नेणारी, भुऱ्या केसांची, गुलाबी गालांची, मोठ्या डोळ्यांची, मळकट कपडे घातलेली, धुळीने भरलेली लहान लहान मुले मोठी लोभस दिसत होती. या मुलुखात आंघोळ क्वचित् करतात. त्यातूनही गुजरासारख्या भटक्या जमातींच्या अंगाला पाणी लागत नसणारच. त्यांच्या मुलींचे सौंदर्य मळकट शरीरांतून व लक्तरांतूनही दिसून येत होते. सौंदर्यवती, गोरीपान दमयंती हीनदीन अशी भटकत भटकत आपल्या मावशीच्या गावी आली; त्या वेळचे महाभारतातील सुंदर वर्णन आठवले.
 बसच्या वाटेने जाताना मधेच पाट्या लागत होत्या. ‘डलहौसा। ‘चंबा', 'कांग्रा'... सारखे मनात येई- आपल्याला काम नसावं, ' मोटर असावी व मन मानेल त्याप्रमाणे या रम्य प्रदेशातून भटकावं. (शतलुज) पाहिली. आता विपाशा (बियासच्या) खोऱ्यातून चालले होते. डलहौसी व चंबाला इरावती (रावी) दिसली असती. जाऊ द्या झालं! जे नाही त्याच्यासाठी पुढे असलेल्याचा उपभोग टाकायचा की काय?