पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[८३]


नवीन आहे यांत शंका नाहीं. या कारखान्यांत हरत-हेच्या वनस्पतींंचे अर्क व सुगंधी फुलांचींं अत्तरें अर्वाचीन रासायनिक पद्धतीनें काढण्यांत येतात. येथेंही कच्चा माल, मजूरवर्ग, वगैरे इतर साधनें असतांना असा कारखाना गेल्या पन्नास वर्षांत निघूं शकला नाहींं. कारण शास्त्रीय ज्ञान असलेल्या योजकाची वाण. परंतु या कारखान्यास केै० कोटीभास्करांसारखे उत्तम रसायन पदवीधर लाधले व त्यांच्या परिश्रमानें हा कारखाना ऊर्जितावस्थेप्रत पावला. परंतु देशाच्या दुर्दैवानें रा. कोटीभास्कर यांस काळानें अकालीं या जगांतून ओढून नेलें व पुन्हां असा योजक मिळून कारखाना उत्तम तऱ्हेनें चालतो किंवा नाहीं, अशी लोकांना व मालकांना भीति उत्पन्न केली.
 परंतु हें काम किती अवघड असलें व त्याला केवढ्याही मोठ्या मानसिक शक्ति लागत असल्या तरी योजक अगर कारखानदार याचा संपत्तीच्या उत्पत्तीमधला कार्यभाग 'श्रम' या कारणांत येतोच; कारण श्रमाची जी व्याख्या दिली आहे ती इतकी व्यापक आहे कीं, त्यामध्यें सर्व प्रकारच्या श्रमांचा अन्तर्भाव होतो; निवळ सांगकाम्या रोजमजुराच्या मेहनतीपासून तों श्रेष्ठ मानसिक गुणांनीं युक्त अशा कामगाराच्या श्रमापर्यंत सर्व अर्थशास्त्रदृष्ट्या 'श्रम' च होत; तर मग योजक व कारखानदार यांना संपत्तीच्या उत्पत्तीचें स्वतंत्र व निराळें कारण मानण्याचें काय कारण असा एक आक्षेप वरील विवेचनावर येईल. त्याला उत्तर असें आहे कींं, मजुरांची अगदींं खालपासून वरच्या दर्जापर्यंत एक चढती माला झाली तरी या सर्व चढत्यामालेमध्यें व कारखानदारामध्यें जातीचा किंवा प्रकाराचा भेद आहे. सर्व मजूर कांहीं एक ठरींव मुशाहिरा घेऊन कांहीं एक ठरींव काम करतात. म्हणजे त्यांच्या श्रमाचा मोबदला करारानें अगर रुढीनें ठरलेला असतो. हे लोक संपत्तींच्या उत्पादनाला मदत करतात; परंतु हे संपत्त्युत्पादनाच्या साधनवर्गामध्यें येतात; हे संपत्तीच्या उत्पादनाची जबाबदारी अंगावर घेत नाहींत. आतां कारखानदाराचा हा विशेष आहे कीं, तो कोणत्या तरी तऱ्हेची संपत्ति करण्याची सर्व जबाबदारी आपल्या अंगावर घेतो व जबाबदारीबरोबर धोकाही येतोच. कारण अर्वाचीन काळींं संपत्त्युत्पादन हें मनुष्य स्नत:च्या गरजा भागविण्याकरितां कधींच करीत नाहीं. कारण तो जी