पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[८१]

 कारण हठींच्या काळच्या प्रचंड कारखान्यांत हजारों मजूर असतात; या सर्वांच्या कामांचें एकीकरण करणें; प्रत्येकाकडून आपापलें नेमून दिलेलें काम वेळच्या वेळीं करून घेणें; इतक्या मोठ्या मजूरवर्गाला शिस्तींत राखणें; एकंदर कारखान्यावर देखरेख करणें व सर्वांना लागेल ती विशेष माहिती देणें; इतकेंच हल्लींच्या कारखानदाराचें काम नाही; तर त्याचें कर्तव्य यापेक्षांही जबाबदारीचें आहे; त्याला सर्व संपत्तीच्या उत्पादनाची जबाबदारी अंगावर घ्यावी लागते; कोणचा माल कारखान्यांत काढावा; तो कोणत्या नमुन्याचा काढावा; तो किती प्रमाणांत काढावा; व कोणत्या वेळीं काढावा; तसेंच तो कोणास व कोणत्या दरानें विकावा; पैसे वसूल कसे करावे; कच्चा माल खरेदी कोठें, कसा व केव्हां करावा; मालाला गि-हाइकी कशी मिळवावी; या सर्व गोष्टी कारखानदारालाच कराव्या लागतात व हीं सर्व कामें उत्तम तऱ्हेनें पार पडण्यास मनुष्यामधल्या सर्वोत्तम मानसिक शक्ति लागतात. पूर्वींच्या काळच्या सैन्यांत सेनापतीला इतकें महत्व नव्हतें; प्रत्येक शिपायाच्या शौर्यावर लढाईचा जयापजय अवलंबून असे; परंतु अर्वाचीन काळीं सैन्यांतील व्यक्तीचें महत्व कमी झालें आहे; जयापजय हे सेनापतीच्या हुशारीवर व सर्व सैन्याच्या हालचाली धोरणानें करविण्यावर आहे; कारण शिकलेलें सैन्य ह्मणजे कळसूत्री बाहुल्याप्रमाणें आहे; सूत्रधार जिकडे नेईल तिकडे तें जाणार. हीच स्थिति हल्लींच्या उद्योगधंद्याची आहे. ज्याप्रमाणें हल्लींच्या काळीं सेनापती व सेनानायक यांच्याखेरीज सैन्याचें क्षणभरसुद्धां चालावयाचें नाहीं; त्याप्रमाणेंच हल्लींच्या काळीं उद्योगधंद्यांतही नायक व धंद्याचा सेनापती यांखेरीज चालावयाचें नाहीं व असे नायक ह्मणजे कारखानदार अगर योजक होत. संपत्तीच्या उत्पत्तीची सव जबाबदारी यांच्यावरच असते. धंद्यांत नफा होणें व यश येणें हें त्यांच्याच कर्तबगारीवर अवलंबून असतें. हल्लींच्या काळी अशीं पुष्कळ उदाहरणें दृष्टीस पडतात कीं, एखादा कर्तृत्ववान् माणूस एखाद्या गांवच्या धंद्याला ऊर्जितावस्था आणतो. परंतु त्याच्या पश्चात् भांडवल, मजुरी व इतर सर्व साहित्य तयार असतांना धंदा बुडतो. कारण त्याच्या मुलाच्या अंगांत योजकाचे गुण असतातच असा नेम नाहीं, व अयोग्य माणसाच्या हातांत धंदा गेल्यामुळें त्या धंद्याचें मातेरें होतें.