पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[७९]

 होत नाहीं. कारण तितका माल तयार करणारें भांडवल देशांत आहेच; व एक प्रकारच्या मालाला मागणी कमी झाली तर दुसरा मागणी असलेला माल उत्पन्न करतां येईल. तेव्हां मागणीच्या कमीअधिकपणानें देशाचें नुकसान होत नाहीं. फक्त देशांतील भांडवलाची इकडून तिकडे हलवाहलव होते इतकेंच.
 या विचारसरणींत एका धंद्यामधून दुस-या धंद्यांत भांडवल व श्रम कांहीं एक नुकसान न होतां घालतां येतात असें गृहीत धरलें आहे हें स्पष्टपणें दिसेलच. परंतु ही गोष्ट वस्तुस्थितीस धरून नाहीं. एका धंद्यांतून दुस-या धंद्यांत भांडवल घालतांना बहुतेक भांडवल नाहींसें होतें. कारण प्रत्येक धंद्याची यंत्रसामुग्री अगदीं वेगवेगळी असते. तेव्हां एका धंद्याचीं यंत्रें दुस-या धंद्यास कशीं उपयोगी पडणार ? तेव्हां कोणत्याही धंद्याच्या मालाला मागणी कमी झाल्यास त्या धंद्याला उतरतीकळा लागते. तसेंच मालाला मागणी वाढली ह्मणजे संपत्ति जास्त करतां येते. कारण देशांतील पुष्कळ भांडवल निकामीं पडलेलें असतें. परंतु मागणी अगर खप याचा संपत्तीच्या वाढीस कसा उपयोग आहे हें मागें एका भागांत दाखविलेंच आहे. तरी त्याची पुन्हां येथें पुनरुक्ति करण्याचें कारण नाहीं.
 वरील प्रमेयें प्रतिपादन करण्यांत भांडवलाबद्दल दोन गोष्टींचें महत्व वाचकांस सांगण्याचा मिल्लचा हेतु होता. त्या दोन गोष्टी ह्याः पहिली भांडवल; हें संपत्तीच्या उत्पत्तीस अपरिहार्य आहे व भांडवलाची वाढ तात्कालिक उपभोगाच्या विलंबावर अवलंबून आहे.