पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत
[६९]

आहे त्यांना त्यांना आपल्या देशांत शिक्षणाचा व कलाकौशल्याचा सार्वत्रिक प्रसार केल्यावांचून गत्यंतर नाहीं. या बाबतींत इंग्लंडमध्यें फार मागाहून जागृति झालेली दिसते. शिक्षणाचा संपत्तीच्या वाढीशीं असलेला कार्यकारणभाव जर्मनी व अमेरिका यांनीं जाणून त्यांनीं आपआपल्या देशांत सामान्य शिक्षण व धंदेशिक्षण यांचा विलक्षण प्रसार केला. म्हणून हीं दोन्ही राष्ट्रें अल्पकालांत सांपत्तिक वैभवाच्या व औद्योगिक प्रगतीच्या शिखरास पोहोंचलेल्या इंग्लंडाला मागें टाकूं लागलीं आहेत. पौर्वात्य जपाननें या बाबतींत जर्मनी व अमेरिका यांचाच कित्ता गिरविला आहे व यामुळें तेथें एकदोन पिढ्यांत शिक्षणाचा इतका प्रसार झाला आहे कीं, या बाबतींत जुन्या सुधारलेल्या राष्ट्रांना मान खालीं घालण्याची पाळी आलेली आहे. हिंदुस्थानांत याही बाबतींत सुधारलेला ब्रिटिश अम्मल सुरू असून आजपर्यंत विशेष जोराचे प्रयत्न होऊं नयेत, ही दुःखाची गोष्ट आहे. तरी पण अलीकडे सरकारचें लक्ष या विषयाकडे लागत चाललें आहे, ही अभिनंदनीय गोष्ट आहे व जसजसें या प्रश्नांवर जोराचें लोकमत तयार होईल, तसतसें सरकारासही जास्त जोरानें पाऊल उचलणे भाग पडेल यांत शंका नाही. हिंदुस्थान सरकार हल्ली सुधारणा आणण्याचा प्रयत्न करीत आहे. पण सामान्य अज्ञान व अक्षरशत्रूपणा या प्रगतीच्या आड नेहेमीं येणार. तरी सांपत्तिक स्थिती सुधारण्याचा मूळ पाया म्हणजे प्राथमिक शिक्षण आहे हें जाणून तें शिक्षण मोफत व हळूहळू सक्तीचें केल्याखेरीज हिंदुस्थानातील श्रमाची कार्यक्षमता वाढणार नाही. व कार्यक्षमता वाढल्याखेरीज सांपत्तिक वाढ होण्यास मोठा प्रतिरोध होईल.
 या बाबतींतील शेवटली गोष्ट म्हणजे मजुरांच्या नैतिक व सामाजिक संवयी व आकांक्षा. देशांतील मजूरलोक आनंदानें व खुषीनें काम करणारे असले व तसेंच त्यांच्यामध्यें सचोटी, कर्तव्यदक्षता इत्यादि गुण असले ह्मणजे या सर्व गुणसमुच्चयानें त्यांची कार्यक्षमता वाढते. गुलामाच्या या नैतिक गुणांच्या अभावामुळे गुलामांचा श्रम अगदी कुचकामाचा ठरतो. कारण गुलामाला खुषीनें काम करण्याची संवय नसते व तो चाबकाच्या भितीनें काम करतो. परंतु अशा नाखुषीनें केलेलें काम अर्थात फारच कमी असतें. सचोटी व कर्तव्यदक्षता हे गुण नसले म्हणजे देखरेखीचा