पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/80

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[६८]

 चांगल्या तऱ्हेनें दिसून येतें. उत्तरहिंदुस्थानांत गहूं हें सामान्य लोकांचे सुद्धां अन्न आहे. यामुळे तेथील लोक जात्या धिप्पाड, मजबूत व सामर्थ्यवान् आहेत. त्यापेक्षां ज्वारी किंवा बाजरी खाणारे लोक कमी सामर्थ्यवान् आहेत व भात खाणारे तर अगदींच कमी मजबूत आहेत. मद्रास, बंगाल व मुंबई इलाख्याचा किनारा हे सर्व भात किंवा त्यापेक्षांही कमी पौष्टिक अन्न खाणारे प्रांत आहेत यामुळे तेथला मजूरवर्ग शक्तींत पुष्कळ कमी आहे.
 मजुरांच्या कार्यक्षमतेबद्दलची तिसरी गोष्ट म्हणजे आरोग्यकारक राहणी. जे जे लोक रोगकारक परिस्थतीत गलिच्छ तऱ्हेनें कोंदट हवेंत व लहान घरकुलांत पुष्कळजण अशा तऱ्हेनें राहतात त्या त्या लोकांमध्यें कार्यक्षमता कमी होते, हें शारीरशास्त्रानें व आरोग्यशास्त्रानें सिद्ध करून दाखविलें आहे. या बाबतीतही निरनिराळ्या देशांत निरनिराळी स्थिति आहे. हा एकंदर राहणीचा प्रश्न आहे व यामुळे येथें धार्मिक कल्पना, सामाजेिक चालीरीती, समाजांतील लोकांच्या वेडगळ समजुती व त्यांचें एकंदर ज्ञान व त्यांची सांपत्तिकस्थिति, या सर्वांवर ही गोष्ट अवलंबून आहे. परंतु या बाबतींत स्वाभाविकपणेंच नवीन वसाहतीची स्थिति बरी असते. जेथें दाट वस्तीस आहे व जेथें शहरांत राहण्याची प्रवृत्ति आह तेथें आरोग्यहारक गोष्टी फार असतात व सुधारलेल्या राष्ट्रांमध्यें यासंबंधीं बहुजनसमाजाची स्थिति सुधारण्याकरितां हजारों रुपये सार्वजनिक पैशांतून खर्च केले जातात. हिंदुस्थानांत या विषयाचें महत्व आतां कोठे थोडें थोडें लोकांच्या दृष्टोत्पत्तीस येऊ लागलें आहे.
 चवथी गोष्ट बुद्धिमत्ता व ज्ञानवत्ता. जितका जितका मजूरवर्ग हुषार तितकी तितकी त्याची कार्यक्षमता जास्त. कारण बुद्धिमान कामकऱ्यास कोणतीही कामें शिकण्यास वेळ लागत नाही; यंत्रांचा उपयोग याला लवकर करतां येतो; कच्या मालाची नासधूस त्याचे हातून कमी होते; व त्याच्या कामावर देखरेख कमी लागते. शिक्षणानें मजुरांची कार्यक्षमता वाढते हें सिद्ध झाल्यापासून सर्व सुधारलेल्या सरकारांनीं प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचें केलें आहे. कारण शिक्षण हें एक सांपत्तिक प्रगतीचें प्रमुख साधन आहे, असें अनुभवानें ठरलें आहे. ज्या ज्या देशांना आपली सांपत्तिक प्रगति व्हावी असे वाटत