पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/75

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[६३]


 जमिनीचा तिसरा गुण म्हणजे तिची सुपीकता अमेरिकेंतील जमिनीच्या विलक्षण सुपीकतेमुळे त्या देशाची इतक्या लवकर सांपत्तिक भरभराट झाली. इंग्लंडच्या भरभराटीलाही तेथल्या जमिनीच्या सुपीकतेची व विशेषतः तेथल्या थंड हवेची व सततच्या पावसाची फार मदत झालेली आहे.
 देशांतील नद्या, समुद्रकिनारा, बंदरें, वायुप्रवाह व पर्वताच्या रांगा वगैरे पृष्ठभागाच्या स्थितीचाही देशाच्था सांपत्तिक स्थितीवर परिणाम होतो, हेंही पुष्कळ देशांच्या इतिहासांवरून दिसून येतें.
 या सर्व बाबतींत हिंदुस्थान देशाची स्थिती फार अनुकूल आहे. आधीं सर्व देश समशीतोष्ण कटिबंधांत असून त्याच्यामध्यें अत्यंत थंड हवेपासून तों अत्यंत उष्ण हवेपर्यंतचें बहुविधत्व आहे. तसेंच सर्व देशांतील बराच मोठा भाग सुपीक असून त्याची सुपीकता अनेकविध कारणांवर अवलंबून आहे. इजिप्त देशाची सुपीकता नाईल नदीच्या पुरावर व त्याच्या कालव्यावर अवलंबून आहे. तशा प्रकारची ही स्थिति-हिंदुस्थानांत मोठमोठ्या नद्या असल्यामुळे-कांहीं प्रांतांत आहे. गंगा, यमुना, सिंधु, व कृष्णा, या नद्यांच्या सभोंवतालचे प्रांत फार सुपीक आहेत; व त्यांची सुपीकता इजिप्तप्रमाणें नदीच्या पुरावर अवलंबून आहे. तसेच कांहीं भागांमध्यें ऋतुमानानें पाऊस मुबलक व निश्चितपणें पडल्यामुळे ते सुपीक झालेले आहेत. जें विशेषण सर्व वसुंधरेला लावतात तेंच विशेषण हिंदुस्थानासही अन्वर्थक आहे. कारण नैसर्गिक संपत्तिच्या दृष्टीनें हिंदुस्थान देश हा बहुरत्ना वसुंधरा याप्रमाणेंच आहे असें म्हणण्यास हरकत नाही.
 भूगर्भसंवंधीही हिंदुस्थानची स्थिती असमाधानकारक नाहीं. येथें मँगॅनीस आहे, रॉकेल आहे, सोनें आहे, तांबे आहे, लोखंड व कोळसा आहे, भूपृष्टविषयक बहुविधताही येथें आहे. तेव्हां धनोत्पाद्नाला जे गुण जमिनीत पाहिजेत ते सर्व येथें आहेत व म्हणून पूर्वकाळीं हिंदुस्थान सांपत्तिक सुधारणेच्या बऱ्याच वरच्या पायरीला गेलेले होतेव आताही भांडवल व योजक या दोन कारणांची जोड झाल्यास हिंदुस्थान युरोपांतील इंग्लंड व जर्मनी व अमेरिका या देशांशीं बरोबरी करूं शकेल यांत तिळमात्रं शंका नाहीं.