पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/74

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[६२]


योग्य उपकरणें या सर्वांची जुळवाजुळव करून व त्यांची एके ठिकाणीं योजना करून प्रत्यक्ष संपात तयार करतो ती योजक किंवा कारखानदार होय. हीं चारों कारणें हल्लीच्या काळीं परस्परांपासून स्वतंत्र असतात. तेव्हां प्रत्येकाच स्वरुप काय व त्याच्या योगानें संपात कशी उत्पन्न होते या गोष्टीचें आतां विवेचन करावयास पाहिजे.
 सृष्टीच्या शक्तीचें समाजाच्या सर्व सांपत्तिक स्थितींत एक मुख्य अंग म्हणजे देशांतील जमीन होय. आधिभौतिक शास्त्राच्या प्रगतीनें देशांतील दुस-या नैसर्गिक शक्तींना औद्योगिक महत्त्व आलें आहे खरें; तरी जमीन व शेतकी हे नैसर्गीिक शक्तीचे सनातन भाग आहेत ही गोष्ट निर्विवाद आहे. म्हणून जमीन हें एक संपत्तीच्या उत्पत्तीचे कारण आहे असें सांगण्याचा अभिमतपंथाचा संप्रदाय आहे.
आतां जमीनीची संपत्ति उत्पादन करण्याची शक्ती ज्या तिच्या कित्येक गुणांवर अवलंबून आहे त्यांचा थोडक्यांत विचार करणें जरूर आहे. प्रदेशाचें हवापाणी हें एक त्याचें मुख्य अंग आहे. कारण पृथ्वीच्या पाठीवर कांहीं भाग असे आहेत कीं, तेथें थंडीच्या तीव्रतेमुळे मनुष्यवस्तीच बहुधा शक्य नसते; व शक्य झालीच तर मनुष्याचें श्रमसर्वस्व निवळ जिवंत राहण्यांतच खर्च होतो व अशा प्रांतांत शेतकीचा उदयच होणें शक्य नसतें. तसेंच कांहीं प्रांत निवळ वालुकामय असून तेथें पाणी मुळीच नसतें. यामुळेंही तेथें धनोत्पादक शतकीचा प्रादुभाव होऊ शकत नाहीं. यामुळे आधिभौतिक सुधारणा बहुतेक समशीतोष्ण कटिबंधाच्या प्रदेशांत व प्रांतांत झालेली आहे, असें दृष्टोत्पत्तीस येतें. कारण तेथें ती होण्यास हवापाणी इत्यादि प्रकारची अनुकूल परिस्थिती असते.
 जमिनीचा धनोत्पादक दुसरा गुण म्हणजे तिची भूगर्भसंबंधीं स्थिती होय. ज्या ठिकाणी निरनिराळ्या धातूच्या खाणी आहेत तेथें संपत्तीची वाढ झपाट्यानें होते. ज्या ज्या ठिकाणीं सोन्यारुप्याच्या खाणी सांपडल्या आहेत ते ते प्रदेश पूर्वी अगदी ओसाड असतांना पांच पन्नास वर्षात आधिभौतिक सुधारणेंत अग्रेसर झालेले आहेत. उदाहरणार्थ, आस्ट्रेलिया देशाची भरभराट पहा. इंग्लंडची सांपत्तिक प्रगती पुष्कळ अंशीं लोखंड व कोळशांच्या खाणीच्या शोधापासून झालेली आहे हें सर्वश्रुतच आहे.