पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/71

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



[५९]


धंदे नाहींसे होऊन त्याचे ठिकाणीं नवे धंदे आले. हाच प्रकार सर्वत्र दिसून येतो. हिंदुस्थानच्या एका शतकाच्या पूर्वीच्या व हल्लीच्या काळाकडे पाहिलें तरीही हेंच दिसून येईल. ज्या ज्या गरजांचें रुपांतर झालें आहे त्यासंबंधींचे जुने धनोत्पादक धंदे जाऊन त्याचे ठिकाणीं नव्या गरजा भागविणारे धंदे आले किंवा या गरजा परकी देशांतील मालानें भागवितां येऊ लागल्या.
 सारांश, संपत्तीच्या मागणीवर संपत्तीची उत्पत्ति अवलंबून आहे हें वरील विवेचनावरून उघड दिसून येईल. निवळ गरजा वाढून उपयोग नाहीं हे खरें. तर त्या गरजा तृप्त करण्यास लागणारें सांपत्तिक सामर्थ्यही लोकांमध्यें आलें पाहिजे हें निर्विवाद आहे. परंतु वासना उत्पन्न झाली म्हणजे मनुष्य ती तृप्त करण्याच्या उद्योगाला लागती व श्रम करून ती वासना तृप्त करण्याचीं साधनें म्हणजे संपत्ति मिळवू लागतो. आफ्रिकेंतील पुष्कळ नीग्रो जाती या श्रम करण्यास मुळींच तयार नसतात. कारण त्यांच्यामध्यें वासनाच उत्पन्न झालेल्या नसतात. परंतु निरनिराळे पदार्थ दाखवून व त्याचा उपयोग शिकवून त्यांच्या वासनाशक्तीला एकदां चालन दिलें म्हणजे अशा जाती श्रम करण्यास प्रवृत्त होतात असा पुष्कळ मिशनरी लोकांनीं आपला अनुभव लिहून ठेविला आहे. ज्या समाजांतील व्यक्तीमध्यें वासना व गरजा यांच्या अल्पतेमुळे समाधानी वृत्ती असते तेथें संपत्तीच्या वाढीस वावच नसतो. ही समाधानवृत्ति नाहींशी होऊन वासनांच्या व गरजांच्या वाढीने असमाधान किंवा असंतोष उत्पन्न होणें ही सांपत्तिक प्रगतीची पहिली पायरीच होय. ‘असंतोषःश्रियोमूलम् ? या संस्कृत म्हणीचे रहस्य यांतच आहे.
 मागणीचा संपत्तीच्या उत्पत्तीवर व वाढीवर कसा फलदायक परिणाम होतो यांचें ताजें उदाहरण हिंदुस्थानांतील गेल्या चार पाच वर्षांचा औद्योगिक इतिहास होय. कांहीं राजकीय व औद्योगिक कारणामुळे जी देशी मालाला मागणी उत्पन्न झाली त्याच्या योगानें गेल्या चार पांच वर्षांमध्यें हिंदुस्थानांत किती तरी झपाट्यानें संपत्तीची वाढू झाली आहे हे सर्व श्रुतच आहे. या मागणीमुळे जे लोक आपआपली धंदे टाकून नवीन धंद्याला लागू लागले होते ते लोक आपल्या पूर्वीच्या धंद्याला परत आले