पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[५६]


षसा सुरक्षितपणा आला नाहीं व ह्मणून त्या देशाची सांपत्तिक स्थिति सुधारली नाहीं. कारण संपत्तीच्या वाढीचा झराच मुळीं फार कालपर्यंत दूषित राहिला.
 हिंदुस्थानचा संगतवार असा इतिहास उपलब्ध नसल्यामुळें इकडील उदाहरणें फारशीं देतां यावयाचीं नाहींत. तरी पण मालमत्तेचा व जीविताचा सुरक्षितपणा व सांपत्तिक भरभराट याचा कार्यकारणसंबंध सिद्ध करतां येण्यासारखीं पुष्कळ उदाहरणें देतां येतील. अयोध्याप्रांताचें एक उदाहरण आहे. हा प्रांत फार सुपीक असून कांहीं कांहीं नबाबांच्या कारकीर्दींत तो फार भरभराटींत होता. परंतु पुढील नबाबांची कारकीर्द फार जुलुमी व अंदाधुंदीची झाल्यामुळें राज्यांत सुनियंत्रित राज्यपद्धति नाहींशी झाली व त्यामुळेंच त्या प्रांताची भरभराट नाहींशी होऊन तो प्रांत कांहीं कालपर्यंत उजाड पडल्यासारखा झाला. अकबराच्या कारकीर्दीमध्यें राज्यव्यवस्था फार चोख असल्यामुळें व जिकडे तिकडे उत्तम शांतता नांदत असल्यामुळें त्या कारकीर्दीत लोक सुखी होते व एकंदर देशामध्यें सुबत्ता नांदत होती. परंतु अवरंगजेबाच्या कारकीर्दीपासून अंदाधुंदीस व अंतःकलहास सुरुवात झाली व अकबराच्या काळीं प्रस्थापिंत झालेली शांतता व त्यायोगानें उत्पन्न होणारा सुरक्षितपणा कमी झाला व त्याचा परिणाम देशांतील सांपत्तिक स्थितीवर झाल्याखेरीज राहिला नाहीं असें इतिहासावरून दिसून येतें.
 संपत्तीच्या उत्पत्तीचें व वाढीचें दुसरें अमूर्त कारण म्हणजे मानवी वासना व त्यांची वाढ हें होय. मनुष्याच्या सुखाचें खरें साधन वासनांची वाढ किंवा वासनांचा छेद हा एक नीतिशास्त्रांतील मोठा वादग्रस्त प्रश्र आहे; व सर्व देशांत दोन्ही प्रकारचीं मतें मोठमोठ्या तत्ववेत्यांनीं प्रतिपादन केलेलीं आहेत. हिंदुस्थानांत आमच्या तत्वज्ञानाचा बहुधा कटाक्ष वासनाछेदाकडेच दिसून येतो. 'जहीहि धनागमतृष्णाम्' हें आमच्या तत्वज्ञान्यांच्या उपदेशाचें पालुपद आहे. परंतु या ठिकाणीं या वादाशीं आपल्याला कांहीं एक कर्तव्य नाहीं. आपल्याला फक्त येथें अर्थशास्त्रदृष्ट्या वासनांचा विचार करावयाचा आहे, व या दृष्टीनें त्यांची वाढ ही संपत्तीस व समाजाच्या आधिभौतिक सुधारणेस अत्यंत आवश्यक आहे यांत कांहींएक संदेह नाहीं. मनुष्याच्या अगदीं