पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/65

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[५३]

 शंका राहात नाहीं. इतिहासावरून आपल्याला असें दिसून येतें कीं, ज्या ज्या राज्यामध्यें हा सुराक्षितपणा उत्तम प्रकारानें प्रस्थापित झाला आहे, तेथें तेथें संपत्तीची वाढ व देशाची भरभराट झालेली आहे. जेथें जेथें हा सुरक्षितपणा प्रथमपासूनच स्थापित झाला नाहीं तेथें तेथें संपत्तीची वाढ होऊं शकली नाहीं. सुरक्षितपणा व संपत्तीची वाढ यांचा कार्यकारणभाव दाखविणारीं हीं अन्वयव्यतिरेकाचीं निरनिराळ्या देशांचीं उदाहरणें देतां येतात; इतकेंच नाहीं, तर आपल्याला एका देशाच्या निरनिराळ्या स्थित्यंतराचें उदाहरण देतां येतें; म्हणजे जोंपर्यंत देशामध्यें मालमतेचा सुराक्षितपणा स्थापित होऊन तो टिकलेला असतो तोंपर्यंत देशाची सांपत्तिक भरभराट होत असते व ती टिकते. परंतु सुधारलेली राज्यपद्धति जाऊन हा सुरक्षितपणा नाहीसा झाल्याबरोबर सांपत्तिक भरभराटीलाही उतरती कळा लागून तो देश दारिद्र्याच्या खोल दरींत बुडतो. हा सिद्धांत प्रस्थापित करण्याकरितां आतां आपण थोडीशीं ऐतिहासिक उदाहरणें घेऊं व प्रथमतः जुन्याकाळांतील मोठया प्रमाणावरील दोन दाखले घेऊ. पहिला रोमन पादशाहीचा व दुसरा पर्शियन पादशाहीचा.
 जुन्या जगांत रोमन पादशाहीच्या इतकें चिरस्थाई असें दुसरें साम्राज्य झालें नाहीं. परंतु त्याच्या या चिरस्थाईपणाच्या मुळाशीं रोमन लोकांचा कायदा होता असें दिसून येतें. रोमन साम्राज्य हें कायद्याचें साम्राज्य होतें व या कायद्यानें व्यक्तीच्या हकांचें उत्तम रक्षण केल जात असे व यामुळे या साम्राज्यांत मालमत्तेला व जीविताला उत्तम तऱ्हेची सुरक्षितता असे. या व्यक्तीच्या हक्कांच्या पवित्रपणामुळें व मालमत्तेच्या सुरक्षितपणामुळेंच रोमन पादशाहीमध्यें लोक फार सुखी होते व त्या साम्राज्याची कित्येक शतकेंपर्यंत सांपत्तिक भरभराट होत होती. रोमन राज्यपद्धतीमध्यें मालमत्तेचा व जीविताचा सुरक्षितपणा किती होता व व्यक्तीच्या हक्कांचे रोमन कायदा किती उत्तम त-हेनें रक्षण करीत असे हें दाखविणारी एक आख्यायिका रोमन इतिहासकार सांगत असतात. ही आख्यायिका रोमन राज्याचा जेव्हां फारसा विस्तार झालेला नव्हता तेव्हांची आहे. अशा त्या राज्याच्या बाल्यावस्थेमध्यें सुद्धां राज्यांतील व्यक्तीमध्यें रोमन कायद्याच्या अंमलानें व्यक्तीच्या हक्काबद्दल व करारपालना-