पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना.



 जी डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्सलेशन सोसायटीची जाहिरात या ग्रंथाच्या लेखनास निमित्तकारण झाली त्या जाहिरातीला आज बरोबर तीन वर्षे झालीं. त्या जाहिरातीस निमित्तकारण म्हणण्याचें कारण हें कीं कर्तव्य म्हणून, जिज्ञासा म्हणून, किंवा आवड म्हणून, पाश्चात्य शास्त्रवाड्मयरूपीं विस्तीर्ण उद्यानांत ज्या ज्या सुंदर वाटिकांत फिरण्याचा मला प्रसंग आला त्या त्या वाटिकांचें शब्दचित्र निवळ मराठी वाचकांकरितां रेखाटावें अशी पुष्कळ दिवसांची मनीषा होती. परंतु "उत्पद्यते विलीयंते दरिद्राणां मनोरथाः" या सुभाषितांतील उक्तीप्रमाणे आजपर्यंत दारिद्रयामुळे मनांतील हेतू मनांत राहिले. माझें हें दारिद्र्य दुहेरी आहे. मी ज्या संस्थेचा तहाहयात सभासद आहें त्या संस्थचें काम इतकें असतें की, ग्रंथलेखनास जी मानसिक स्वस्थता व जी फुरसत लागते ती मिळत नाहीं. शिवाय आपल्या देशांत अझून या बाबतींत श्रमविभागाचें तत्व अंमलांत आलें नसल्यामुळे ग्रंथलेखकास ग्रंथप्रकाशकाचीही जबाबदारी व काळजी अंगावर घ्यावी लागते. व ती घेण्याचें मला सामर्थ्य नव्हतें. परंतु वर उल्लेख केलेल्या जाहिरातीनें ही अडचण झाल्यास दूर होईल असें पाहून जाहिरातीप्रमाणें पुस्तक लिहिण्याचा बेत तर कायम केला. परंतु बेत कायम करणें व तो हातून शेवटास जाणें यांत किती तरी अडचणी उत्पन्न होतात. त्याप्रमाणें येथेंही झालें. मनुष्याच्या मनाला अगदीं व्यग्र करून टाकणारी, त्याची मानसिक स्वस्थता घालविणारी अशी प्रियपत्नीच्या असाध्य रोगाची घरगुती अडचण उत्पन्न झाली व यामुळे सोसायटीच्या जाहिरातींतील दोन वर्षे केव्हांच निघून गेलीं व पुस्तकाच्या लेखनास प्रारंभही झाला नाहीं. तरी पण प्रियपत्नीच्या आजारांत व तिच्याच प्रोत्साहनाने कायम केलेला बेत शेवटास न्यावयाचा असा विचार करून पुस्तकास प्रारंभ केला. अशी या पुस्तकलेखनाची पूर्वपीठिका आहे. अर्थात हें पुस्तक गेल्या नऊदहा महिन्यांतच प्रायः लिहिलें गेलें आहे. इतक्या थोड्या अवकाशांत सर्व पुस्तक लिहावें लागल्यामुळें रात्रीचा दिवस करून काम करावें लागलें हें सांगणें