पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[४३]

समाज अजून कृषिवृत्तीतच आहे. हिंदुस्थानांत शेंकडा ७५ लोक शेतकरी आहेत. या बाबतींत हिंदुस्थानाला ब्रिटिश अंमलाखालीं थोडेथोडें ओद्योगिक स्वरूप येत चाललें आहे खरें; तरी पण प्रमुखत्वेंकरून हिंदुस्थान अजूनही कृषिवृत्ति देश म्हणण्यास हरकत नाहीं. ब्रिटिश अंमलापासून व इंग्रजी शिक्षणानें लोकांच्या गरजा वाढत आहेत, अभिरुचि बदलत चालली आहे, संपत्तीचा उपभोग घेण्याची प्रवृत्ति होत आहे, तसेंच उद्योगधंद्यांचीं साधनें वाढत आहेत, यामुळे हिंदुस्थानांतील कांहीं शहरें उद्योगधंद्यांचीं आगरें बनू लागलीं आहेत. अशा शहरांमधील एखाद्या लक्ष्मीपुत्राच्या राजवाड्यासारख्या सुंदर बंगल्यांत व कातवाडयाच्या झोपडींत जमीनअस्मानचें अंतर दिसून येतें व यावरून मृगयावृत्ति व उद्योगवृत्ति या दोन अवस्थांमधल्या राहणींतील फरक दिसून येतो.

                    --------------------
भाग चवथा
                      مختھے چھینچ
                   अर्थशास्त्राचे विभाग.
                    --------------------

 आमच्या प्रास्ताविक पुस्तकाचा हा शेवटला भाग होय. यामध्यें या शास्त्राचे सामान्यतः कोणकोणते भाग पाडले जातात व आम्ही कोणते पाडले आहेत, व कोणत्या क्रमानें आम्ही सर्व विषयांचें विवेचन करणार आहों; याचें थोडेंसें शब्दचित्र रेखाटून हें प्रास्ताविक पुस्तक संपविण्याचा विचार आहे.
 पहिल्या प्रास्ताविक पुस्तकाचा हेतु व विषय हा आतांपर्यंतच्या विवेचनावरून वाचकांच्या ध्यानांत आला असेलच. ज्या शास्त्राचें विवेचन या ग्रंथांत करावयाचें योजिलें आहे,त्याची पूर्वपीठिका, त्याची व्याख्या व त्या शास्त्राचा विषय जी संपत्ति तिचें शास्त्रीय लक्षण व आतां त्या शास्त्रांतील विवेचनाच्या सोईकरतां केलेल्या पुस्तकांचें स्पष्टीकरण इतका भाग या प्रास्ताविक पुस्तकांत आणला आहे.