पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/538

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 [५२२] ह्मणजे त्या प्रांतांतील लोकसंख्येला लागणारें धान्य दुस-या प्रांतांतून आणावें लागतें. या प्रांतांतही शेतक-यांची स्थिति किंचित् तरी सुधारत आहे;निदान खालावत तरी नाहीं खास. तसेंच ज्या ठिकाणीं पाटबंधा-याचीं कामें झालीं आहेत त्या लगतच्या शेतक-यांची स्थितिही ब-यापैकीं आहे. या बाबतींत सर्व हिंदुस्थानामध्यें पंजाबसारखी सुधारणा कोठेंच झाली नाहीं. पंजाबांत सरकारनें पाटबंधा-याचीं कामें फारच मोठया प्रमाणावर सुरू केलीं आहेत व कालव्याच्या लगतीला सरकारनें नवी वसाहत केली आहे. या सर्व लोकांची सांपत्तिक स्थिति फार चांगली आहे. व कालव्याच्या प्रसारानें एकंदर पंजाब प्रांताची भरभराट होत चालली आहे असें सर जेम्स विलसन यांनीं या वर्षाच्या प्रारंभीं रॉयल एकानॉमिक सोसायटीपुढें वाचलेल्या निबंधावरुन दिसून येतें. येथपर्यंत हिंदुस्थानच्या सांपत्तिक स्थितीचा पूर्व इतिहास व हिंदुस्थानची सद्यः सांपत्तिक स्थिति याचें शब्दचित्र वाचकांपुढें मांडलें. आतां हिंदुस्थानची सांपत्तिक स्थिति सुधारण्यास अर्थशास्त्रांतील कोणतीं तत्वें व सिद्धांत लागू पडतील हें पहावयाचें राहिलें. तें आतां थोडक्यांत आटोपून या लांबलेल्या लेखनसत्राची समाप्ति करण्याचा बेत आहे. वरील विवेचनावरून हिंदुस्थान हा अजून प्रायः कृषिवृत्ति देश आहे असें दिसून येईल. कारण जुन्या काळची उद्योगविविधता नाहींशी होऊन अलीकडील दोन पर्वांत हिंदुस्थानांत शेतकीवर लोकांचा मारा पडूं लागला. अजूनही जवळ जवळ शेंकडा ७०|७५ लोक शेतकीवर निर्वाह करणारे आहेत. व या लोकांची सामान्यतः दैन्यावस्था आहे हेंही आपण पाहिलें. परंतु प्रसिद्ध जर्मन अर्थशास्त्री लिस्ट यानें ह्मटल्याप्रमाणें हिंदुस्थान हें हल्लीं कृषिवृत्ति स्थितींतून उद्योगवृत्ति स्थितींत जाण्यास योग्य अशा स्थितींत आलें आहे. अधिक सुधारलेल्या देशांशीं असलेल्या दळणवळणानें व आजपर्यंतच्या खुल्या व्यापारतत्वानें देशांत नानात-हेचा माल येऊं लागला आहे व त्यायोगें व पाश्चात्य शिक्षणानें लोकांमध्यें चांगल्या रहाणीची अभिरुचि उत्पन्न झालेली आहे व लोकांच्या वासना व खर्च करण्याची प्रवृत्ति पुष्कळच वाढलेली आहे. तेव्हां ही परिस्थिति देशांत उद्योगधंद्याचा उदय व वाढ जोरानें