पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/536

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 [५२०] त्यांत अमुक दिवसांनीं पैसे परत देईन असा करार केला कीं, कराराची अट्र पाळण्याची जबाबदारी शेतक-यावर आली. त्यानें वेळेवर पैसे आणून द्लिे नाहीत कीं, फिर्यादीचें कारण प्रतिवादीकडून घडतें व ह्मणून सर्व खर्च प्रतिवादीच्या डोक्यावर बसतो. बरें, सावकारास फिर्याद करणें जरूर. कारण अमुक मुदतीत फिर्याद न केल्यास कर्ज मुदतीबाहेर जाईल. तेव्हां त्याला फेरखत करून घेणें किवा फिर्याद करणें भाग. परंतु याचा सर्व खर्च मात्र शेतक-यावर पडणार. सारांश, सुधारलेला कायदा व अज्ञानी शेतकरी यांचा मिलाफ म्हणजे राक्षस व वामनमूर्ति यांच्या सहकारित्वासारखा होय. ज्याप्रमाणें या सहकारिपणांत वामनमूर्तीचाच नेहमीं तोटा व्हावयाचा तसाच प्रकार शेतक-यांचा झाला. तेव्हां आमच्या शेतकरीवर्गाचा कर्जबाजारीपणा हा पुष्कळ अंशानें अलीकडील १०० वर्षांत इंग्रजी अंमलांतील मार्गे सांगितलेल्या करवसुलीचा कडक नियम, स्टँपाची भानगड व कायदेकानूंचीं तत्वें यांनीं उत्पन्न झालेला आहे. यामुळे इंग्रजी अमलांत शेतकीचें उत्पन्न वाढलें खरें. एकंदर शर्तीत पहिल्यापेक्षां उत्पन्न जास्त होऊं लागलें -याला शेवटचें-१८९६-९७ सालापासून आजपर्यंतचें पर्व अपवाद आहे. कारण या पर्वांत पुष्कळ वर्षें अवर्षणाची, कमी पावसाचीं किवा दुष्काळाचीं होतीं व या पर्वांत शेतकऱ्यांचीं गुरेंढोरें मरून शेतकीची हलाखी झाली. तरी पण त्याचा शेतक-यांना फायदा मिळाला नाहीं. त्यांना सावकार, वकील व स्टँपाच्या रूपानें सरकार इतके नवे वाटेकरी उत्पन्न झालें. यामुळें दळणवळणाच्या योगानें शेतक-याच्या मालाला गि-हाईक वाढलें व किंमत वाढली. तरी पण त्याचा फायदा त्याला मिळाला नाहीं. शिवाय प्रत्येक जमाबंदीच्या वेळीं त्याच्यावरील सारा वाढला तो निराळाच. आणखी एका कारणानें शेतक-यांची हलाखी झाली. तें ह्मणजे जंगलखात्याची स्थापना. पूर्वीच्या काळीं शेतक-यांस जंगलें हीं मृष्टीच्या देणगीसारखीं असत. यामुळें लांकुडफांटें, शेताच्या खतास लागणारा चोळामाेळा व गुरांस चरण हीं मुबलक असतं व त्याला त्याबद्दल शेताच्या उत्पन्नांतून काहींएक द्यावे लागत नसे. उलट जंगलाच्या या अप्रत्यक्ष उत्पन्नाची त्याच्या उत्पन्नांत एक प्रकारें भर पडत असे. एखाद्या नोकरास पैशाची मजुरी देऊन शिवाय कांहीं जिनसा वर दिल्या ह्मणजे तितकी त्यांची