पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/532

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[५१६] या काळांत संपत्तीची विषम वांटणी होण्याचें पहिलें कारण हें कीं बरेच धंदे व व्यापार इंग्रज व्यापारी व भांडवलवाले यांच्या हातांत गेले. उदाहरणार्थ, हिंदुस्थानांत गेल्या साठ वर्षांत नवीन कृषिज व खनिज संपत्ति उत्पन्न करण्याचे कारखाने निघाले ते बहुतेक युरोपियन कंपन्यांनीं व युरोपीयन लोकांनींच काढले. यामुळे या धंद्यांत मिळणारें भांडवलावरील व्याज, नफा, व जमिनीचा खंड हे तिन्ही नव्या संपत्तीचे वांटे युरोपियनास मिळाले. व अर्वाचीन काळीं संपत्तीचे हेच वाट मोठे असतात. येथल्या लोकांना फक्त या संपत्तीपैकीं मजुरीचा वांटा मिळाला; परंतु या देशांतील एकंदर समाजाच्या साध्या राहणीनें पूर्वापार चालत आलेली मजुरीचा दर फार हलका होता. तेवढा हलका दरच येथल्या लोकांना मिळाला. सांपत्तिक बाबतींत मागसलेल्या देशानें पुढारलेल्या देशांतील भांडवलाचा उपयोग केला पाहिजे व त्याप्रमाणें जपानसारखीं स्वतंत्र राट्टे ही परकी भांडवलावर देशांत कारखाने काढतात व ही गोष्ट देशाच्या फायद्याचीच आहे. मग हिंदुस्थानांत युरोपियन भांडवल आल्यानें हिंदुस्थानचें नुकसान कां व्हावें असा एक मुद्दा या ठिकाणीं केव्हां केव्हां आणण्यांत येतो. त्याचाही येथें खुलासा होईल. देशाच्या सांपत्तिकक भरभराटीकरितां भांडवल जरूर आहे व लागल्यास तें परदेशाहून आणावें, परंतु हें भांडवल लोकांनी आणून देशांतील लोकांनी कारखाने उभारले तर त्यांत देशाचा जास्त फायदा आहे. कारण त्या योगानें संपत्तीच्या चार वांट्यांपैकी खंड, नफा व मजुरी असे तीन वांटे देशांत राहतात व त्या एक वांटा ब्याज-हामात्र परदेशी जातो. परंतु हिंदुस्थानांत याच्या उलट स्थिति झाली आहे. यामुळे संपत्तीच्या वाढीपासून बहुजनसमाजास फारसा फायदा झाला नाहीं. संपत्तीच्या विषम वांटणीस उत्तेजन देणारें दुसरें कारण म्हणजे इंग्रजी न्यायपद्धति होय.या पद्धतीनें हिंदुस्थानांतील शेतकऱ्यांची स्थिति फार हलाखीची झाली यांत संशय नाहीं. तेव्हां त्याचा थोड्या विस्तारानें विचार केला पाहिजे. इंग्रजांपूर्वींची इकडची न्यायपद्धति अगदीं साधी व बिनखर्चाची होती. बहुतेक तंट्याभांडणाचा निकाल गांवपंचाइतीनें होई. आधीं ठरीव