पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/531

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[५१५] ण्याची पद्धतिही कमी कमी होत चालली व लोक आपआपल्या उत्पन्नाच्या मानानें जास्त जास्त खर्च करूं लागले याचाही परिणाम संपत्तीच्या वाढीवर व व्यापारावर झाल्यावांचून राहिला नाही. याप्रमाणें संपत्तीच्या वाढीचीं दोन अमूर्त कारणें व दोन प्रत्यक्ष कारणें या ६० वर्षांच्या पर्वांत अस्तित्वांत आलीं व यामुळे या काळांत संपत्तीची वाढ होऊं लागली. तसेंच या काळांत सर्वत्र शांतता झाल्यानें लढाया वगैरे चालू नसल्यानें लोकसंख्येच्या वाढीस जोरानें सुरुवात झाली. व लोकसंख्येची वाढ ह्मणजे श्रम करणारांची वाढ अथवा संपत्तीच्या एका मूर्त कारणाचीच वाढ होय. यामुळे ही संपत्ति जास्त वाढावी हें स्वाभाविक आहे. या लक्षणावरूनच एक पक्ष हिंदुस्थानची सांपत्तिक भरभराट होत आहे असें प्रतिपादन करीत आला आहे. परंतु ही संपत्तीची वाढ दर माणसीं किती वाढली व ती हिंदुस्थानच्या पहिल्या पर्वापेक्षां जास्त वाढली किंवा काय याची तुलना करण्यास पुरेशी माहिती नाहीं. परंतु १७५० पाचून १८५० पर्यंतच्या काळापेक्षां या काळांत संपत्तीची वाढ झालेली आहे ही गोष्ट निर्विवाद आहे. परंतु ज्याप्रमाणें इंग्लंडमध्यें औद्योगिक क्रांतीपासून संपत्तीची देशांत विलक्षण वाढ झाली तरीं या वाढीच्या मानानें बहुजनसमाजाची सांपत्तिक स्थिति सुधारली नाहीं तर ती उलट कांहींशी वाईटच झाली; मात्र या क्रांतीपूर्वी समाजामध्यें सामान्यतः संपत्तीची वांटणी समान होती ती या काळांत फारच विषम झाली; अर्थात् श्रीमंत व गरीब यांमध्यें जो पूर्वी फारसा फरक नव्हता तो आतां या दोन वर्गामध्यें जमीनअस्मानचा फरक पडला; या विषम वांटणीनें सामान्य लोकांची स्थिति इंग्लंडच्या भरभराटीच्या दिवसांतही वाईट झाली; त्याप्रमाणेंच हिंदुस्थानांतील गेल्या ६० वर्षातील स्थिति झाली आहे. देशांत संपत्ति पुष्कळ वाढली ही गोष्ट निर्विवाद आहे. परंतु या संपत्तीच्या वाढीबरोबरच संपत्तीच्या विषम वांटणीचीं कारणें अस्तित्वांत आल्यानें हिंदुस्थानांतील सामान्य लोकांची सांपत्निक स्थिति वाईट झाली, निदान संपत्तीच्या वाढीच्या मानानें सुधारलेली नाहीं. तेव्हां आतां या कारणांचा विचार केला पाहिजे. ह्मणजे हिंदुस्थानच्या संपत्तिविषयक तीव्र मतभेदांतील सत्यासत्याचा भाग तेव्हांच ध्यानांत येईल.